मुंबई: अभिनेत्री कंगना राणावत हिच्या कार्यालयावरील कारवाईनंतर वादात सापडलेल्या मुंबई महापालिकेनं आता अभिनेता यांच्याविरोधात कारवाईची तयारी केली आहे. सोनू सूद यानं जुहू येथील निवासी इमारतीत कुठल्याही परवानगीशिवाय हॉटेल सुरू केल्याची तक्रार महापालिकेनं जुहू पोलिसांकडं केली आहे. तसंच, पोलीस कारवाईची मागणी केली आहे.

त्यानुसार, जुहू येथील एबी नायर रोडवर शक्ती नगर ही सहा मजली इमारत आहे. ही इमारत निवासी आहे. मात्र, सोनू सूद यानं इमारतीचं रूपांतर हॉटेलमध्ये केलं आहे. त्यासाठी परवानगी घेण्यात आलेली नाही. त्यासाठी त्यानं परवानगी घेतली नसल्याचं महापालिकेचं म्हणणं आहे. या प्रकरणी पाठवलेल्या नोटिशीची दखलही सोनूनं घेतली नसल्याचं महापालिकेनं तक्रारीत म्हटलं आहे. एमआरटीपी (महाराष्ट्र रिजीन अँड टाउन प्लानिंग) कायद्यांतर्गत अंतर्गत पोलिसांनी या प्रकरणाची दखल घ्यावी, अशी विनंती महापालिकेनं पोलिसांना केली आहे.

वाचा:

महापालिकेच्या नोटिशीविरोधात सोनू सूद यानं ऑक्टोबर महिन्यात शहर दिवाणी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाकडून त्याला दिलासा मिळाला नाही. उच्च न्यायालयात जाण्यासाठी त्याला ३ आठवड्यांची मुदत देण्यात आली होती. हे तीन आठवडे उलटून गेल्यामुळं आम्ही तक्रार दाखल केली आहे, असं महापालिकेच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं.

सामाजिक कार्यकर्ते गणेश कुसमुलू हे दोन वर्षांपासून या प्रकरणाचा पाठपुरावा करत होते. लोकायुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार महापालिकेनं सोनू सूद याच्याविरोधात तक्रार केल्याचं कुसमुलू यांनी सांगितलं. महापालिकेनं आता पाडकामाची कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सोनू सूद म्हणतो…

सोनू सूद यानं मात्र आरोप फेटाळले आहेत. जागेच्या वापरात बदल करण्यासंदर्भात महापालिकेनं परवानगी दिल्याचं सोनूनं म्हटलं आहे. केवळ महाराष्ट्र किनारपट्टी विभाग व्यवस्थापन प्राधिकरणाकडून (MCZMA) या संदर्भातील परवानगी येणं बाकी आहे. कोविड संकटामुळं ही परवानगी मिळू शकलेली नाही. यात कसलीही अनियमितता नाही,’ असं त्यानं स्पष्ट केलं आहे.

पोलीस म्हणतात…

महापालिकेनं केलेल्या तक्रारीच्या आधारे आम्ही या प्रकरणाची प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. चौकशीअंती गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती झोन ९ चे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी दिली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here