केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाच्या समर्थनासाठी कणकवली येथे भव्य ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील, आमदार नितेश राणे हेदेखील उपस्थित होते. त्यावेळी नारायण राणे यांनी काँग्रेस आणि शिवसेनेवर हल्ला चढवला.
७० वर्षांमध्ये काँग्रेसला जे जमलं नाही. शेतकऱ्यांसाठी काही करु शकले नाहीत. तेच आज विरोध करत आहेत, आंदोलनं करत आहेत. शेतकऱ्यांनी पिकवलेला माल विकायला देखील बंधनं, कायदे होते. मला कुठं विकायचा? कसा विकायचा? दलाला मार्फत विकायचा मग कष्टाचे पैसे मिळाले नाही तरी तोट्यात जाऊन विकायचा. हे गेले ७० वर्षांतील कायदे पंतप्रधानांनी मोडीत काढले आहेत, असं म्हणतं नारायण राणेंनी काँग्रेसवर टीका केली आहे.
हे राजकीय आंदोलन आहे. त्यामुळे त्यात सेटलमेंट होईल असं वाटत नाही, असं म्हणतानाच राहुल गांधींना शेतीतलं काय कळतं. ते काय बोलतात हे त्यांना कळतं का? राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत आहेत, त्यांना शेतीतलं काय कळतं? कापूस उत्पादक शेतकरी आत्महत्या का करतो? हे तरी यांना माहीत आहे का? असे सवालही त्यांनी केला. भाजप शेतकऱ्यांसाठी विधायक कामं करत आहे. भाजपच शेतकऱ्यांना न्याय देऊ शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times