राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर पोलीस दलामध्ये अनेक बदल करण्यात आले होते. गृहमंत्रालयानं काही निर्णयही घेतले होते. पोलीस दलातील सततच्या हस्तक्षेपाला सुबोधकुमार जयस्वाल यांचा विरोध होता. त्यातून ते नाराज असल्याची चर्चा होती. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी देखील यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. कालांतरानं जयस्वाल यांनी केंद्रीय सेवेत परतण्याची परवानगी राज्य सरकारकडं मागितली होती. राज्य सरकारनं ती दिल्यानंतर केंद्र सरकारनं केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी त्यांची नियुक्ती केली. तसंच, त्यांना कार्यमुक्त करण्याची विनंती केली होती. त्यानुसार त्यांना कार्यमुक्त करण्यात आलं आहे.
वाचा:
जयस्वाल यांच्या रिक्त जागेवर नियुक्तीसाठी बिपीन बिहारी, संजय पांडे, रश्मी शुक्ला या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा होती. मात्र, तूर्त हेमंत नगराळे यांनी त्यात बाजी मारली आहे. १९८७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले नगराळे यांच्याकडं सध्या कायदे व तंत्रज्ञान विभागाची जबाबदारी आहे. त्यासोबतच त्यांना महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.
वाचा:
महाराष्ट्र पोलिसांसमोर अनेक आव्हानं आहेत. मात्र, अशा आव्हानांवर मात करून पोलीस दल पुढं जात आहे. पोलिसांनी रात्रंदिवस कष्ट करून करोनावर ज्या पद्धतीनं मात केलीय, त्यावरून आपल्याला हे दिसून येतं. पोलीस दलाचं कार्य यापुढंही असंच सुरू राहील आणि सरकारनं माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याचा मी प्रयत्न करीन, असं हेमंत नगराळे यांनी पदभार स्वीकारल्यानं बोलताना सांगितलं.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times