मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेना यांच्यातील वाद अद्याप सुरु असतानाच मुंबई महानगरपालिकेनं अभिनेता सोनू सूदवर कारवाईचा बडगा उचलला आहे. महापालिकेच्या या निर्णयानंतर कंगनानंतर शिवसेनेच्या निशाण्यावर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण याचा घेतलेला थोडक्यात आढावा

महापालिकेची तक्रार

सोनू सूद यानं जुहू येथील निवासी इमारतीत कुठल्याही परवानगीशिवाय हॉटेल सुरू केल्याची तक्रार महापालिकेनं जुहू पोलिसांकडं केली आहे. तसंच, पोलीस कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणी पाठवलेल्या नोटिशीचीही सोनू सूदनं दखल घेतली नसल्याचं पालिकेनं म्हटलं आहे. महापालिकेच्या नोटिशीविरोधात सोनू सूद यानं ऑक्टोबर महिन्यात शहर दिवाणी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाकडून त्याला दिलासा मिळाला नाही. उच्च न्यायालयात जाण्यासाठी त्याला ३ आठवड्यांची मुदत देण्यात आली होती. हे तीन आठवडे उलटून गेल्यामुळं आम्ही तक्रार दाखल केली आहे.

सोनू सूदचं उत्तर

सोनू सूद यानं मात्र आरोप फेटाळले आहेत. जागेच्या वापरात बदल करण्यासंदर्भात महापालिकेनं परवानगी दिल्याचं सोनूनं म्हटलं आहे. केवळ महाराष्ट्र किनारपट्टी विभाग व्यवस्थापन प्राधिकरणाकडून (MCZMA) या संदर्भातील परवानगी येणं बाकी आहे. कोविड संकटामुळं ही परवानगी मिळू शकलेली नाही. यात कसलीही अनियमितता नाही, असं सोनू सूदनं स्पष्ट केलं आहे.

शिवसेनेच्या रडारवर का?

करोना संकटाच्या काळात हजारो मजूरांना त्यांच्या घरी परत जाण्यासाठी खासगी बसेस उपलब्ध करुन दिल्या होत्या. त्याबरोबर अनेक सामाजिक कार्यातही त्यानं हातभार लावला होता. त्यामुळं करोना संकटाच्या काळात सोनू सूद देवदूत ठरला होता. त्याच दरम्यान शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून सोनू सूदवर टीका करण्यात आली होती. सोनू सूद भाजपचा प्यादा म्हणून काम करतोय की काय, अशी शंकाही शिवसेनेकडून उपस्थित करण्यात आली होती. तसंच, सोनू सूद एकटा एवढं काम कसा करु शकतो, त्याच्याकडे अशी कोणती यंत्रणा आहे?, असे सवालही शिवसेनेकडून उपस्थित होत होते.

शिवसेनेनं केलेल्या टीकेनंतर सोनू सूदविषयी अनेक उलट सूलट विषयांवर चर्चा होत होत्या. या सर्व राजकीय टीका-टिप्पणीनंतर सोनू सूदनं मातोश्री जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. तसंच, त्यानं एक ट्विट करत त्याची भूमीकाही स्पष्ट केली. मला कोणत्याही राजकीय नेत्याचा किंवा पक्षाचा पाठिंबा नसून मी हे काम फक्त माणूसकीच्या नात्याने करतोय, असं त्यानं म्हटलं होतं. त्यानंतर सोनू सूद आणि शिवसेनेतील वादावर पडदा पडला होता. मात्र, मुंबई महानगरपालिकेनं केलेल्या कारवाईनंतर पुन्हा एकदा सोनू सूद शिवसेनेच्या रडावर आला आहे का, अशा चर्चां रंगू लागल्या आहेत.

कंगना आणि शिवसेना वाद
कंगना आणि शिवसेनेच्या वादाची सुरुवात सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर झाली. सुशांतसिंह प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या कंगनाला शिवसेनेनं खडसावलं होतं. त्यानंतर राज्यात शिवसेना विरुद्ध कंगना राणावत असं चित्रच उभं राहिलं होतं. यानंतरही कंगनानं मुंबईबाबत अक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. कंगनाच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेनं कंगनाला मुंबईत येऊन दाखवण्याचं आव्हान दिलं होतं. शिवसेनेच्या या आव्हानाला उत्तर देत कंगना मुंबईत आली खरी. पण त्याच दरम्यान, कंगनाचं कार्यालय बेकायदेशीर ठरवून मुंबईनं त्यावर कारवाई केली होती. त्यानंतर हा वाद कोर्टातही पोहोचला होता.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here