मुख्यमंत्र्यांच्या तातडीच्या बैठकीनंतर इंदूर आणि नीमचमधील चिकनच्या दुकानांमधून नमुने घेण्यात आले होते. यापैकी दोन ठिकाणी कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लू असल्याची खात्री पटली आहे. यानंतर, पशुसंवर्धन विभागाने नीमच आणि इंदूर जिल्ह्यातील त्या ठिकाणांपासून एक किलोमीटर अंतरावर असलेली चिकन मार्केट सात दिवस बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. या व्यतिरिक्त पोल्ट्री फार्म, जलाशयांच्या आसपासच्या पोल्ट्री आणि स्थलांतरित पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी भोपाळ येथे पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मध्य प्रदेशात आतापर्यंत इंदूर, मंदसौर आणि आगर मालवा जिल्ह्यातून पाठवलेल्या पक्ष्यांच्या नमुन्यांमध्ये बर्ड फ्लू आढळून आला आहे. तर नीमच, देवास, उज्जैन, खंडवा, खरगोन आणि गुना जिल्ह्यातून पाठवण्यात आलेले कावळ्यांचे नमुनेही पॉझिटिव्ह आले होते. या जिल्ह्यांमधील मृत कावळ्यांचे नमुने भोपाळमधील एका प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. अशाप्रकारे मध्य प्रदेशातील ९ जिल्ह्यांमध्ये मेलेल्या कावळ्यांमध्ये बर्ड फ्लू आढळला आहे.
फक्त मध्य प्रदेशातच नाही तर बर्ड फ्लूचा संसर्ग देशातील अनेक राज्यांमध्ये दिसून आल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. केरळ, राजस्थान, गुजरात, हरयाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब या राज्यांमध्ये आतापर्यंत बर्ड फ्लूशी संबंधित प्रकरणं नोंदली गेली आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times