नगर-दौंड रस्त्यावर ही संस्था आहे. ही संस्था संरक्षण विभागाच्या अंतर्गत येते. संस्थेच्या देशभरात ५२ शाखा आहेत. त्यातील नगरची एक शाखा आहे. नगरच्या शाखेतील प्रयोगशाळेने आतापर्यंत अनेक उपयुक्त संशोधने केली आहेत. संरक्षण विभागासाठी आवश्यक असलेली वाहने आणि अन्य सामुग्री येथे विकसित झाली आहे. याशिवाय वाहनांची तपासणी करून त्यांना प्रमाणित करणारा विशेष ट्रॅकही या संस्थेत आहे. आता मात्र ही संस्था बंद करून ती चेन्नई किंवा अन्य ठिकाणच्या शाखेत वर्ग करण्याच्या हालचाली सुरू असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. त्यामुळे स्थानिकांमधून या स्थलांतरास विरोध होऊ लागला आहे. राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना यासंबंधी एक निवेदन दिले. दिल्लीत संरक्षण विभागात प्रयत्न करून ही संस्था नगरमधून जाणार नाही, याची काळजी घ्यावी, नगरमधील एक हजार कुटूंबियाचे यामुळे नुकसान होणार असून त्याचा विकासावरही परिणाम होऊ शकतो, असे लंके यांनी पवार यांना सांगितले.
याशिवाय शिवसेनेनेही या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. ही संस्था नगरमधून बाहेर जाऊ नये यासाठी आंदोलन करणार असल्याचे शिवसेनेचे माजी शहर प्रमुख संभाजी कदम यांनी सांगितले.
वाचा:
दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही संस्था अन्यत्र स्थलांतरित करण्याच्या हालचाली वरिष्ठ पातळीवरून सुरू आहेत. डीआरडीमधील अधिकाऱ्यांकडून तसे संकेत नगरच्या शाखेला मिळालेले आहेत. मात्र, अंमलबजावणी कशी होणार, केव्हा होणार, येथील अधिकारी-कामगारांचे काय होणार? यासंबंधी अद्याप स्पष्टता नाही. मात्र, देशपातळीवर विखुरलेल्या संरक्षण विभागाच्या संस्था, विशेषत: प्रयोगशाळांचे एकत्रिकरण करण्याच्या हालचाली केंद्र सरकारकडून सुरू असल्याचे सांगण्यात येते. त्यामध्ये नगरच्या व्हीआरडीईचाही समावेश होत आहे.
मोठी आणि महत्वाची संस्था
देशाच्या संरक्षण विभागातही या संस्थेचे महत्त्व मोठे आहे. नगरमध्ये हजारो एकर जागेत ही संस्था विस्तारली आहे. या संस्थेचे येथून स्थलांतर झाल्यानंतर या जागेचे काय होणार? की या जागेसाठीच स्थलांतर केले जात आहे, असेही प्रश्न उपस्थित केले जात आहे. १९४७ ला ही संस्था नगरला आणण्यात आली. सुरवातीला ती जामखेड रोडवर होती. त्यानंतर दौंड रोडवरील हजारो एक जागेत ती वसविण्यात आली. संस्थेत जागतिक दर्जाचे संशोधन चालते. वाहनांचा तपासणी ट्रॅक आणि अन्य यंत्रणाही जागतिक दर्जाची आहे. या संस्थेचे कार्य अनेक मान्यवरांकडून वेळोवेळी गौरविले गेले आहे.
वाचा:
संस्थेतील कर्मचारी संघटनेने माजी केंद्रीय राज्य मंत्री दिलीप गांधी यांना निवेदन देऊन लक्ष घालण्याची मागणी केली आहे. व्ही.आर.डी.ई संरक्षण संस्थेत भारताच्या सशस्त्र सेनेला लढण्यासाठी लागणारी शास्त्रे, रणगाडे, मिसाईल लॉंचर, बुलेटप्रुफ वाहने, प्रोटोटाईप, ड्रोनइंजिन आदी उपलब्ध करून देते आहे. भारताला आत्मनिर्भर करण्यात व्ही.आर.डी.ईचा मोलाचा वाटा आहे. व्ही.आर.डी.ई मध्ये सध्या वैज्ञानिक, अधिकारी, व कार्माचारी मिळून सुमारे ५०० नागरिक कार्यरत आहेत. तसेच ४०० स्थानिक कर्मचारी कराराने व १०० शिकवू कर्मचारी कार्यरत आहेत. जवळपास १००० कुटुंबांचा उदार्निवाह व्ही.आर.डी.ई च्या माध्यमातून होत आहे. स्थानिक नागरिकांना मोठा रोजगार देणारीही संस्था आहे. ती राज्याबाहेर गेल्यास २० ते २५ वर्षापासून येथे सरकारी सेवा देणाऱ्यांचा कर्मचाऱ्यांना बेरोजगार व्हावे लागेल. हे थांबवायासाठी तातडीने प्रयत्न करावेत, असं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. ही संस्था बाहेर जाऊ दिली जाणार नाही,असे आश्वासन गांधी यांनी दिलं आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times