नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वीच दुबईमध्ये झालेल्या आयपीएलमध्ये महेंद्रसिंग धोनी हा कर्णधार आणि खेळाडू म्हणून अपयशी ठरला होता. पण त्याचा कोणताच परिणाम धोनीच्या मानधनावर झालेला नाही. कारण आयपीएलमध्ये तब्बल १५० कोटी रुपयांचे माधन घेणारा धोनी हा पहिला खेळाडू ठरणार आहे.

धोनी हा या वर्षी होणाऱ्या आयपीएलमध्येही चेन्नई सुपर किंग्स संघाचे नेतृत्व करणार आहे. त्यामुळेच धोनी आयपीएलमध्ये १५० कोटी रुपयांचे मानधन पटकावणारा पहिला खेळाडू ठरणार आहे. आतापर्यंत एवढे मानधन भारताचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनाही मिळाले नसल्याचे पाहायला मिळत आहे.

धोनीला जेव्हा पहिल्यांदा चेन्नईच्या संघाने संधी दिली तेव्हा त्याचे मानधन सहा कोटी रुपये होते. त्यामुळे तीन वर्षांमध्ये धोनीने १८ कोटी रुपये कमावले होते. तीन वर्षांनंतर धोनीचे मानधन वाढवण्यात आले आणि ते ६ वरुन ८.२८ कोटी रुपये करण्यात आहे. हे मानधन त्याचे तीन वर्षे पुढे कायम राहिले. त्यानंतर धोनीचे मानधन २०१४ आणि २०१५ या वर्षांमध्ये १० कोटी रुपये एवढे होते, त्यामुळे या दोन वर्षांत धोनीने २० कोटी रुपये कमावले. त्यानंतर धोनी जेव्हा पुण्याच्या संघात आला तेव्हा त्याचे मानधन १२.५० कोटी एवढे होते, त्यामुळे दोन वर्षांमध्ये धोनीने २५ कोटी रुपयांची कमाई केली होती.

आयपीएलमध्ये २०१८ साली मोठा लिलाव करण्यात आला तेव्हा धोनीचे मानधन प्रत्येक वर्षासाठी १५ कोटी रुपये एवढे होते. चेन्नईच्या संघाबरोबर तो तीन वर्षे खेळला त्यामुळे या कालावधीमध्ये धोनीने ४५ कोटी रुपये कमावले. आतापर्यंत धोनीच्या आयपीएलमधील कराराच्या मानधनाचा विचार केला तर त्याने १३७ कोटी रुपये कमावले आहेत. आता या वर्षीही धोनी खेळणार असून त्याला १५ कोटी रुपये मिळणार आहेत. त्यामुळे या वर्षी धोनी आयपीएलमधील १५० कोटी रुपयांचे मानधन पूर्ण करणार आहे. हे फक्त धोनीच्या कराराच्या रक्कमेबाबत आहे. आतापर्यंत धोनीला जे आयपीएलमध्ये बक्षिसं मिळाली त्याचा विचार केला तर नक्कीच धोनीने आयपीएलमध्ये २०० कोटी रुपयांची मिळकत कमावली आहे.

आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वात जास्त मानधन हे धोनीच्या नावावर आहे. या यादीमध्ये दुसरा क्रमांक मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचा येतो. रोहितने सर्वाधिक जेतेपदे मुंबईच्या संघाला जिंकवून दिली आहेत. आतापर्यंत रोहितने आयपीएलमधील करारामधून १३१ कोटी रुपये कमावले आहेत. आयपीएलमधील आरसीबीचा कर्णधार विराट कोहली या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. कोहलीने आतापर्यंत आयपीएलमधील करारानुसार १२६ कोटी रुपये कमावले आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here