वाचा:
मुख्यमंत्री बदलल्यानंतर हे ट्विटर हँडल हस्तांरित करण्यात आले. सुरुवातीला त्याच्या प्रोफाइल फोटोवरून चर्चा झाली होती. सुरुवातीला विधानभवन आणि नंतर ठाकरेंचा फोटो त्यावर होता. नंतर माझे कुटंब माझी जबाबदारी मोहीम सुरू झाल्यापासून या मोहिमेचा लोगोच प्रोफाइलवर ठेवण्यात आला आहे. सप्टेंबर २०१९ पर्यंतचे ट्वीटस त्यावर उपलब्ध आहेत. तेव्हापासूनच ज्या ज्या वेळी औरंगाबादचा उल्लेख आला आहे, त्यावेळी संभाजीनगर म्हटले आहे. काही वेळा कंसात म्हटले असले तरी अनेकदा केवळ संभाजीनगर असाच उल्लेख आहे.
करोना काळात मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधत असत. त्याचे लाइव्ह प्रसारणही याच हँडलवरून केले जाते. त्यातही वेळोवेळी मुख्यमंत्र्यांनी ‘संभाजीनगर’ असाच उल्लेख केल्याचे आढळून येते. अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकांतूनही मुख्यमंत्र्यांच्या तोंडी संभाजीनगर असाच उल्लेख असल्याचे आढळून येते. एका दौऱ्याची माहिती देणाऱ्या ट्वीटमध्ये उस्मानाबादचा उल्लेखही ‘धाराशीव’ असा केल्याचे दिसून येते.
वाचा:
औरंगाबाद महापालिकेच्या निमित्ताने नामांतराचा मुद्दा पुन्हा पुढे आला आहे. मात्र, हा वाद पेटण्यापूर्वीही सीएमओकडून औरंगाबादचा ‘संभाजीनगर’ असाच उल्लेख करण्यात आल्याचे आढळून येत आहे. आता याला काँग्रेसचा आक्षेप आहे. मात्र, २ डिसेंबरला मंत्रिमंडळातील एका निर्णयाची माहिती देताना काँग्रेसचे मंत्री अमित देशमुख यांच्या नावाने करण्यात आलेल्या ट्वीटमध्येही संभाजीनगर असाच उल्लेख आलेला आहे. त्यावेळी काँग्रेससह सर्वांनीच याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.
वाचा:
अलीकडे मात्र हा मुद्दा पेटल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी यावर आक्षेप घेतला आहे. त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना न बोलता माहिती व जनसंपर्क विभागाला जबाबदार धरले आहे. ‘माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने शहरांचे परस्पर नामांतर करू नये, सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचे भान बाळगावे. शहरांचे नामांतर करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही. छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे. त्यांच्या नावाचा वापर करून नामांतराचे राजकारण खेळू नये,’ असे थोरातांनी बजावले आहे. त्यानंतरही पुन्हा मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हँडलवर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आल्याने काँग्रेसकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times