औरंगाबाद नामांतरावर उद्धव ठाकरे म्हणाले…
नामांतराने शहराचा विकास होता का? असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नाव न घेता थेट शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केला होता. त्याला उद्धव ठाकरे यांनी आज उत्तर दिलं. औरंगाबाद नामांतराचा मुद्दा हा काही नवीन नाही. आम्ही अनेक वर्षांपासून यासाठी पाठपुरवा करत आलो आहोत. काँग्रेसने औरंगाबादच्या संभाजीनगर नामांतराला विरोध करण्याचं काही कारण नाही. कारण औरंगजेब हा काही धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येत बसत नाही. तसंच किमान समान कार्यक्रम हा वेगळा आहे. यामुळे त्याला कुठलाही धक्का लागणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरून आघाडीतील मतभेद समोर आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला. ही बाब काँग्रेसला रुचलेली नाही. यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नामांतरावरून बुधवारी शिवसेनेवर निशाणा साधला. महाविकास आघाडीतील किमान समान कार्यक्रमाची आठवण करून देत नामांतरामुळे शहराचा विकास होत नाही. यामुळे वातावरण बिघडवणं योग्य नाही, असं थोरात म्हणाले होते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times