म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर: ( ) संभाजीनगर करावे ही जनतेची भावना आहे, सरकारला जनतेच्या भावनेनुसार निर्णय घ्यावे लागतात,त्यामुळे या प्रकरणातही राज्य सरकार जनतेच्या भावनेप्रमाणे निर्णय घेईल अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार बैठकीत दिली. दरम्यान, कोल्हापुरातील रा. शाहू महाराजांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी राज्य सरकार तातडीने धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगतिले.

मंत्री शिंदे यांनी सांगितले की, राज्याच्या विकासाला बळ देण्यासाठी एकसमान बांधकाम नियमावलीचा निर्णय सरकारने घेतला. यापुढेही असे विकासाला पूरक असणारे अनेक निर्णय घेण्यात येतील. राज्यात शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या प्रमाणे राजर्षी शाहू महाराजांचे भव्य स्मारक करण्याची सरकारची भूमिका आहे. शाहू मिल येथे राजर्षी शाहू महाराजांचे आंतरराष्ट्रीय स्मारक करण्यासाठी मिलच्या जागेच्या हस्तांतरणाबाबत प्रक्रिया करण्यात येईल. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून स्मारकाबाबत तातडीने धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल.

राज्यात दोन्ही काँग्रेसमुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची घुसमट होत आहे का असे विचारले असता ते म्हणाले, शिवसेनेचे कार्यकर्ते हे लढाऊ आहेत. त्यामुळे त्यांची घुसमट वगैरे काहीही होत नाही.

कोल्हापुरातील शाहू समाधी स्थळ, रंकाळा सुशोभिकरण, तीर्थक्षेत्र आराखडा, महापालिकेची नवीन प्रशासकीय इमारत, पन्हाळा येथे लेझर शो यासह आवश्यक सर्व प्रकल्पांना निधी देण्यात येईल असेही शिंदे यांनी सांगितले. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठी नव्याने प्रस्ताव पाठविल्यास त्याबाबतही सरकार सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी खासदार धैर्यशील माने, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाश आबिटकर, जिल्हा प्रमुख विजय देवणे, संजय पवार, मुरलीधर जाधव, रविकिरण इंगवले यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here