सिडनी, : ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन तिसऱ्या दिवशी मैदानात चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला. पेनचा पारा मैदानात एवढा चढला की त्याने चक्क पंचांनांच शिव्या घातल्याचे पाहायला मिळाले.

नेमकं घडलं तरी काय, पाहा…ही गोष्ट मैदानात घडली ती भारताचा फलंदाज चेतेश्वर पुजाराच्या बाबातीत. फलंदाजी करत असताना एक चेंडू पुजाराच्या बॅट आणि पॅडला लागला. त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी जोरदार अपील केली. त्यावेळी मैदानातील पंचांनी पुजाराला नाबाद ठरवले. त्यानंतर पेनने डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला.

तिसरे पंच जेव्हा रिप्ले पाहत होते, तेव्हा चेंडू हलकासा पुजाराच्या बॅटच्या जवळ असल्याचे पाहायला गेले. त्याचबरोबर चेंडू थोडासा पुजाराच्या बॅटला लागल्याचेही दिसत होते. पण कदाचित तिसऱ्या पंचांनी यावेळी मैदानावरील पंचांचा निर्णय कायम ठेवण्याचे ठरवले आणि त्यांनी पुजाराला नाबाद ठरवले. त्यानंतर ऑस्ट्रेलिया कर्णधार टीम पेन हा चांगलाच भडकला होता.

तिसऱ्या पंचांनीही जेव्हा पुजाराला नाबाद ठरवले तेव्हा पेनचा पारा चढला आणि तो मैदानावरील पंच पॉल विल्सन यांच्याकडे गेला आणि त्याने अपशब्द वापरले. त्यानंतर विल्सन यांनी पेनला सांगितले की, हा निर्णय तिसऱ्या पंचांनी दिला आहे आणि मी मैदानावरील पंच आहे. पण त्यानंतरही पेन शांत झालेला पाहायला मिळाला नाही. त्यानंतरही पेनने पंचांना अपशब्द वापरल्याचे पाहायला मिळाले.

पंचांनी नाबाद दिल्यामुळे पुजारा खेळत राहीला आणि त्याने अर्धशतकही झळकावले. पण ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पेनने यावेळी जे कृत्य केले ते क्रिकेटच्या प्रतिमेला काळे फासणारे होते. पेनना अन्य पद्धतीनेही या गोष्टीचा निषेध करता आला असता, पण पेनने तसे केले नाही. त्यामुळेच पेनवर या दिवसाचा खेळ संपल्यावर कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. जर मैदानावरील पंचांनी पेनची तक्रार सामनाधिकाऱ्यांकडे केली तर या प्रकरणाची चौकशी होऊ शकते. त्याचबरोबर पेनने आपली चुकी मान्य केली तर त्याच्यावर सामनाधिकारी कडक कारवाई करू शकतात.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here