नागपूर: भारतात मुस्लिमांचा कधीच छळ झालेला नाही, असा दावा करतानाच नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात चुकीची माहिती पसरवली जात असून मुस्लिमांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे, असा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महासचिव यांनी केला.

नागपूर येथे संघ मुख्यालयात ध्वजारोहण केल्यानंतर संवाद साधताना भैय्याजी जोशी यांनी हा दावा केला. इस्लामच्या अनुयायांचा आतापर्यंत भारतात छळ झालेला नाही. शेजारच्या देशातून कोणताही नागरिक भारतात येत असेल, मग तो मुसलमान असला तरी त्याला कायद्याच्या प्रक्रियेनुसारच नागरिकत्व मिळेल. त्यात इतरांना आक्षेप घेण्याचं कारणच काय? असा सवाल जोशी यांनी केला.

कोणतंही गांभीर्य न पाळता चुकीच्या सूचनांचा प्रसार केला जातोय. सीएएच्या मागची भूमिका आणि भावनेचा नीट विचार केला असता तर कुणालाही त्याचा विरोध करण्याची वेळ आली नसती. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून सरकारने वारंवार स्पष्टीकरण दिलं आहे. खुलासा केला आहे. मात्र तरीही काही समूहांकडून या कायद्याच्या विरोधात वातावरण निर्मिती केली जात आहे. संसदेने हा कायदा मंजूर केला असून आता हा कायदा स्वीकारला गेला पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.

या आधीच्या सरकारनेही या कायद्यात दुरुस्ती केली होती, असं सांगतानाच जनतेने चुकीच्या माहितीपासून सावध राहावे, असं आवाहनही त्यांनी केलं. कोणतीही विदेशी व्यक्ती भारतात राहता कामा नये. हा अधिनियमद्वारे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील हिंदुंनाच नव्हे तर जैन, शीख, बौद्ध आणि ख्रिश्चनांना नागरिकत्व देण्यासाठी तयार करण्यात आला आहे. त्यामुळे देशात अशांतता निर्माण करणं योग्य नव्हे, असंही ते म्हणाले.

श्रीलंकेतील नागरिकांना नागरिकत्व देण्याची परवानगी का देण्यात आली नाही? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर श्रीलंकेतील नागरिकांना यापूर्वीच नागरिकत्वाची परवानगी देण्यात आली होती. आता तिथे धार्मिक आधारावर कुणाचाही छळ होत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. भारताकडे स्वत:चं संविधान असल्याचा अभिमान असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here