सिडनी, : तिसरा दिवस भारतीय संघासाठी चांगला गेला नाही. भारतीय संघाला आज एकामागून एक धक्के बसत गेले. पण आजच्या सामन्यात भारताचा फिरकीपटू आर. अश्विनने मात्र कमाल केली. आजच्या सामन्यात अश्विनने इतिहास रचल्याचेही पाहायला मिळाले.

आजच्या दिवशी अश्विनने ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला बाद केले, त्याचबरोबर अश्विनचा एक विश्वविक्रम आता समोर आला आहे. क्रिकेट विश्वामध्ये सर्वात जास्त डावखुऱ्या फलंदाजांना बाद करण्याचा विश्वविक्रम आता अश्विनच्या नावावर नोंदला गेला आहे. आतापर्यंत अश्विनने क्रिकेट विश्वात सर्वाधिक १९३ डावखुऱ्या फलंदाजांना बाद करण्याचा विश्वविक्रम केला आहे. यापूर्वी हा विक्रम श्रीलंकेचा माजी महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनच्या नावावर होता.

मुरलीधरनने आतापर्यंत १९१ डावखुऱ्या फलंदाजांना बाद केले आहे. या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन असून त्याने आतापर्यंत १८४ डावखुऱ्या फलंदाजांना बाद केले आहे. या यादीमध्ये संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचे दोन माजी महान गोलंदाज आहे. ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्न आणि ग्लेन मॅग्रा यांनी आतापर्यंत १७२ डावखुऱ्या फलंदाजांना बाद केले आहे. अश्विनने या सामन्यात अजून एक चमकदार कामगिरी केली आहे.

अश्विनने आतापर्यंत वॉर्नरला तब्बल १० वेळा बाद करण्याचा पराक्रम केला आहे. आतापर्यंत अश्विनने सर्वाधिक बाद केलेल्या फलंदाजांच्या यादीत वॉर्नर पहिल्या स्थानावर आहे. कारण अश्विनने यापूर्वी इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कुकला ९ वेळा बाद केले होते. त्याचबरोबर अश्विनने आतापर्यंत इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला सात वेळा आऊट केले आहे.

तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसरा दिवस ऑस्ट्रेलियाच्या संघाच्याच नावावर राहिला. पण त्याचबरोबर भारताला या तिसऱ्या दिवशी एकामागून एक धक्के बसल्याचेही पाहायला मिळाले. तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने २ बाद १०३ अशी मजल मारली असून त्यांच्याकडे एकूण १९७ धावांची आघाडी आहे. त्याचबरोबर भारतीय संघाला आज रिषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांच्या दुखापतीचे दोन मोठे धक्केही बसले आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here