ग्रामपंचायत निवडणुकांचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघात या निवडणुकीला पवार विरुद्ध शिंदे असे स्वरूप आले आहे. हे दोघेही प्रचारात सक्रिय झाले असून आरोपप्रात्यारोपांच्या फैरी झडत आहेत. ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध व्हाव्यात, अशी भूमिका पवार यांनी घेतली होती. त्यासाठी त्यांनी बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतीला ३० लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली होती. याला विरोध करताना शिंदे यांनी हे तर मतदारांना प्रलोभन असून अशा घोषणा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. तेव्हाच निवडणुकीत राजकारण पेटण्याचे संकेत मिळाले होते. पुढे या मतदारसंघातील १० ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली. उरलेल्यांसाठी सध्या प्रचार सुरू आहे.
वाचा:
खर्डा येथे प्रचाराचा प्रारंभ करताना पवार यांनी शिंदे यांच्या टीकेला उत्तर दिले. ते म्हणाले, ‘निवडणुका बिनविरोध करण्याचा माझा मूळ विचार विरोधकांना पटलाच नाही. गावात गटबाजी नको, लोकांनी एकत्र येऊन विकासाला चालना द्यावी, असा माझा विचार होता. मात्र, ज्यांचे राजकारण गटबाजी करून पोळी भाजण्याचे आहे, त्यांना हे समजणार नाही. गेल्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघात सामान्यांचा आवाज दडपून टाकून निवडणुका घेण्याची पद्धत पडली आहे. आता हे प्रकार आम्ही खपवून घेणार नाही. आमच्या कार्यकर्त्यांना कोणी अरेरावी आणि दादागिरीची भाषा करीत असेल तर त्यांनी लक्षात घ्यावे की माझ्यासारखा ‘सामाजिक गुंड’ कोणी नाही. लोकशाही मार्गाने निवडणुका होऊ द्याव्यात, त्यातच सर्वांचे भले आहे,’ असेही पवार यांनी सुनावले.
वाचा:
भाजपच्या प्रचार सभेत बोलताना प्रा. शिंदे यांनी पवार यांना उत्तर दिले आहे. शिंदे म्हणाले, ‘हा मतदासंघ गेल्या २५ ते ३० वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला आहे. विधानसभा निवडणुकीत भुलभुलय्या केला गेला. आता लोक त्याला बळी पडणार नाहीत. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर हा मतदारसंघ भाजपचाच बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध होईल. मागील एक दीड वर्षात या मतदारसंघात जे काही सुरू आहे, त्यावरून ते ‘समाज गुंड’ आहेत की ‘गुंड’ हे लोकांच्या चांगलेच लक्षात आले आहे. या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून सोशल मीडियात नौटंकी सुरू आहे. आपण या भागाचे लोकप्रतिनिधी असताना काय बदल झाले, काय कामे झाली, हे लोक जाणून आहेत. तोच विचार करून ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान होईल,’ असेही शिंदे म्हणाले.
अजितदादांच्या ‘टग्याची’ आठवण…
काही वर्षांपूर्वी सांगली जिल्ह्यातील एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी वापरलेला ‘टग्या’ हा शब्द चर्चेत आला होता. ग्रामीण राजकारणाबद्दल बोलताना ते म्हणाले होते. ‘तालुका पातळीवर निवडणूक जिंकण्यासाठी खूप काही करावे लागते. हे येड्यागबाळ्याचे काम नाही. त्यामुळे सन्मार्गी लोक या वाटेकडे फिरकतही नाहीत. या कामासाठी गावाने ओवाळून टाकलेले टगे किंवा अर्कच कामी येतात. मी पण अशाच प्रकारे तालुका पातळीवर निवडून आलो आहे, त्याअर्थी मीसुद्धा टग्याच आहे’. पुढे दीर्घकाळ हा शब्द राजकारणात चर्चेत राहिला होता. आता यांनी वेगळ्या अर्थाने ‘सामाजिक गुंड’ हा शब्द चर्चेत आणला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times