ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाजन नगर येथे आले असता, त्यांनी पत्रकरांशी संवाद साधला. यावेळी माजी आमदार स्नेहलता कोल्हे, पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य भानुदास बेरड, शहराध्यक्ष भैय्या गंधे, सुनील रामदासी, सचिन पारखी आदी उपस्थित होते.
‘ सध्या आपली भूमिका रोज बदलत आहे. शिवसेनेची कोणतीही स्वतःची मूल्य राहिलेले नाहीत,’ असा आरोप करतानाच महाजन पुढे म्हणाले, ‘शिवसेनेला सध्या कुठल्याही परिस्थितीत मुख्यमंत्रीपदी राहायचे आहे. त्यासाठी त्यांना सर्व पक्षांना सोबत घेऊन जायचे आहे. त्यामुळेच बोलायचे एक आणि करायचे दुसरे, ही भूमिका त्यांची आहे.
मागील काळात शिवसेना आमच्यासोबत होती. त्यावेळेस त्यांनी औरंगाबादच्या नामांतराविषयी आग्रह करायचा होता. मात्र त्यावेळी शिवसेना काही बोलली नाही. आता मात्र निवडणुका समोर बघून मतदारांना कशा भूलथापा मारायच्या, त्यांना कशी भुरळ टाकायची, त्यासाठी हा सर्व प्रयत्न चालवला आहे. शिवसेनेकडे राज्यातील सत्ता आहे, त्यांचे मुख्यमंत्री आहेत. आता त्यांनी औरंगाबादचे नामांतरण संभाजीनगर करण्याबाबत निर्णय घ्यावा, त्याला आमचा पाठिंबा असेल. परंतु शिवसेना दाखवते वेगळे आणि करायचे काहीच नाही, अशा पद्धतीने काम करते. औरंगाबाद नामांतराचा बाबतीत देखील त्यांची भूमिका ही दुटप्पी अशीच आहे. औरंगाबादचे स्थानिक लोक शिवसेनेवर खूप चिडले असून नाराज आहेत. कारण त्यांच्याकडे सत्ता असली तरी तेथे आठ आठ दिवस लोकांना पाणी येत नाही. त्यामुळेच केवळ आता लोकांना भुरळ टाकण्यासाठी शिवसेनेने नामांतराचा मुद्दा काढला आहे,’ अशी टीकाही महाजन यांनी केली.
नामांतराच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत बिघाडी होईल का? असे विचारले असता महाजन म्हणाले, ‘महाविकास आघाडीत बिघाडी होईल का नाही? हा त्यांचा प्रश्न आहे. पण मला असे वाटते की, त्यांची भूमिका ही वेळोवेळी बदलत असते. तसं पाहिलं तर काँग्रेस आणि शिवसेना या दोघांचे विचार पूर्व-पश्चिम आहेत. तरीसुद्धा त्यांनी युती केली. सत्तेसाठी, खुर्चीसाठी शिवसेना काही करू शकते, हे आपण या माध्यमातून पाहिले आहे. त्यामुळे त्यांना नामांतराच्या मुद्द्याचे फार घेणेदेणे नाही. ही फक्त महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांची घोषणाबाजी चालली आहे. ते शेवटच्या क्षणी तडजोड करतील, आम्ही फक्त ओरडू, निवडणूक करून घेऊ, नंतर बघू काय ते व तुम्ही म्हणाल तसे करु,’ असंही ते काँगेसला सांगत असतील,’ असा आरोपही महाजन यांनी शिवसेनेवर केला.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times