मुंबईः मुंबई महानगरपालिकेसाठी दोन आयुक्त असावे, अशी मागणी काँग्रेस नेते आणि मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केली आहे. शेख यांनी केलेल्या या मागणीचा भाजपने कडाडून विरोध केला असून काँग्रेसवर आरोपही केले आहेत.

पालिकेसाठी एकच आयुक्त असल्याने नागरिकांचे प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित राहतात. शिवाय मुंबई उपनगरात राहणाऱ्या नागरिकांना विविध प्रशासकीय कामांसंदर्भात छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील पालिका मुख्यालयात यावे लागते. नागरिकांची होणारी ही गैरसोय पाहता मुंबई शहर व उपनगरासाठी दोन महापालिका आयुक्त असणं गरजेचं आहे, अशी मागणी शेख यांनी केली आहे. तर, भाजपचे अतुल भातखळकर यांनी या मागणीवर तीव्र आक्षेप घेत हा मुंबईच्या विभाजनाचा डाव, असल्याचा आरोप केला आहे.

मुंबईसाठी दोन आयुक्त नेमून त्यामाध्यमातून मुंबईचे विभाजन करण्याचा काँग्रेसचा डाव आहे. पण त्यांची ही खेळी भाजप कधीच यशस्वी होऊ देणार नाही. असा काही प्रयत्न झाल्यास भाजप त्याला विरोध करेल, असा इशाराच त्यांनी दिला आहे. शिवाय, मागील वर्षी काँग्रेसच्या नसीम खान यांनीही हीच मागणी केली होती, असंही त्यांनी नमूद केलं आहे.

मुंबईच्या पालकमत्र्यांनी केलेल्या मागणीवर मुख्यमंत्र्यांचं काय मत आहे ते त्यांनी जाहीक करावं, अशी मागणीही अतुल भातखळकर यांनी केली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here