दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असतानाच हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांची धावपळ सुरू झाली आहे. ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे आणि महाजन यांनीही यापूर्वी हजारे यांच्याशी चर्चा केली होती. गेल्या भेटीत महाजन हजारे यांच्याकडून काही कागदपत्रे घेऊन गेले होते. वरिष्ठांशी चर्चा करून कळवितो, असे सांगून ते गेले होते.
शनिवारी महाजन नगरला आले होते. येथून पुण्याला जाताना अचानक ते राळेगणसिद्धीला गेले. तेथे पुन्हा हजारे यांच्याशी चर्चा केली. यावर बोलताना हजारे म्हणाले की, या दोघांसोबत आपल्या जुन्याच मागण्यांवर चर्चा झाली. त्यात नवीन काही नव्हते. मागण्यासंबंधी सध्या तरी सरकारकडून काहीही उत्तर मिळालेले नाही. त्यामुळे आंदोलन करण्यावर आपण ठाम आहोत.
पत्रकारांशी बोलताना महाजन म्हणाले की, पुण्याला जाताना हजारे यांची भेट घेण्यासाठी आलो. त्यांच्याशी चर्चा केली. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी हजारे यांचे बोलणे करून दिले. या मागण्यांसाठी उच्चाधिकार समिती नेमण्याची हजारे यांची मागणी आहे. ती दिल्लीतील वरिष्ठांना कळविण्यात येईल. खरे तर हजारे यांच्या या मागण्या पूर्वीच मार्गी लागल्या असत्या, मात्र करोनामुळे मंत्रालय आणि सरकारचे कामकाज विस्कळीत झाले होते. त्यामुळे त्या राहून गेल्या. आता पुन्हा कामे सुरू झाली आहेत. त्यामुळे या मागण्यांवर नक्कीच विचार होईल, असेही महाजन म्हणाले.
मागील वेळीही हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आता प्रत्यक्ष आंदोलन सुरू झाल्यावरही महाजन यांनीच मध्यस्थीची भूमिका बजावली होती. आताही त्यांच्या राळेगणसिद्धीच्या चकरा वाढल्या आहेत. एका बाजुला दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांसोबत चर्चेच्या फेऱ्या सुरू असताना तशाच त्या हजारे यांच्यासोबतच सुरू ठेवण्याची सरकारची योजना असल्याचे दिसून येते.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times