मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या एका ट्विटमुळं चर्चेत आलेले शिवसेनेचे सोलापूरमधील माजी नेते महेश कोठे यांच्यामुळं राज्यातील राजकारण रंगण्याची शक्यता आहे. असं असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते यांनी भाष्य केलं आहे.

सोलापूर शहर मध्य मतदारसंघांमधून बंडखोरी केल्यामुळं महेश कोठे यांची शिवसेनेमधून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोठे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचं ट्विट केलं होतं. मात्र, काही वेळातच हे ट्विट डिलीट करण्यात आलं. त्यामुळं नेमकं महेश कोठे कोणत्या पक्षात आहेत याविषयी गोंधळ निर्माण झाला आहे. याविषयी अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘महेश कोठे हे मागील सहा ते आठ महिन्यांपासून अस्वस्थ आहेत. काहीतरी वेगळी भूमिका घ्यावी असं त्यांच्या मनात सुरु आहे. त्यांच्याबाबत बातम्यामधूनच वाचलं आहे,’ अशी सूचक प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.

‘महाविकास आघाडीमध्ये मागेच ठरलं आहे. सरकार चालवत असताना आणि आपल्याला इतर पक्षांचा पाठिंबा दिला असताना एकमेकांच्या पक्षाची फोडाफोडी करु नये, असं ठरलेलं आहे. आम्ही मागील १५ वर्षात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता असताना काँग्रेसमधून राष्ट्रवादीत आणि आमच्या पक्षातून काँग्रेसमध्ये जात होते. त्यामुळं आम्ही भाऊभाऊच काम करत असल्याने तेव्हा विशेष अडचण नव्हती. पण यावेळी मात्र सुरुवातीच्या काळात सरकार आल्यानंतर आपण काही बंधनं पाळावीत, अशी चर्चा झाली आहे,’ असं पवारांनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here