म.टा. प्रतिनिधी, नागपूर: एका १७ वर्षीय युवतीने तिच्या प्रियकराचा दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संकेत मधुकर तायडे (वय १८, रा. सुशीलापुरम, काटोल) असे या प्रकरणातील मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना ११ डिसेंबर २०२० रोजी काटोल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मौजा पठार शिवार येथे घडली.

संकेत हा मजुरीची कामे करीत असे तर आरोपी तरुणी एका हार्डवेअरच्या दुकानात काम करीत होते. मौजा पठार शिवारच्या जंगलात संकेतचा मृतदेह आढळून आला होता. त्याच्या डोक्याच्या मागील भागाला दगडाचा मार होता. यातच त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी बांधला. त्यामुळे सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र संकेतचे वडील मधुकर तायडे यांनी संकेतच्या प्रेयसीवर आरोप करणारी तक्रार दाखल केली.

संकेत आणि या प्रकरणातील १७ वर्षीय आरोपी तरुणीचे गत दीड वर्षांपासून प्रेमसंबंध होते. हे दोघे ११ डिसेंबर रोजी दुपारी अडीचच्या सुमारास मौजा पठार शिवार येथील जंगलात गेले. संकेत सातत्याने या तरुणीवर वर्चस्व गाजविण्याचा तसेच तिला आपल्या नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करीत असे. यातून दोघांमध्ये वाद होत. घटनेच्या दिवशीही त्यांच्यात वाद झाला. यात या तरुणीने संकेतच्या डोक्यावर दगडाने मारले. यात त्याचा मृत्यू झाला, असे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here