म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

खारमधील इमारतीत ३१ डिसेंबरच्या रात्री झालेल्या ‘त्या’ पार्टीत सर्वजण धुंदीत होते. नेमके काय घडले, हे नीट कुणालाच सांगता येत नसल्याने अखेर शनिवारी पार्टीतील ‘तो’ प्रसंग पुन्हा उभा करण्यात आला. श्री आणि दिया तसेच पार्टीतील इतर काहींना घेऊन घटनाक्रम मांडण्यात आला. पोलिस, फोरेन्सिक तज्ज्ञ तसेच डॉक्टरांच्या पथकाने यावेळी घटनाक्रमाची तसेच सापडलेल्या पुराव्यांची जुळवाजुळव केली.

खारच्या भगवती हाईट्स या इमारतीमध्ये ३१ डिसेंबरच्या पार्टीत श्री जोगधनकर आणि दिया पडळकर यांनी केलेल्या मारहाणीत या तरुणीचा मृत्यू झाला होता. जान्हवीचा श्री आणि दिया यांच्यासोबत नेमका वाद काय झाला? तिघेही नशेत होते का? दुसऱ्या मजल्यावरून जान्हवीला फेकण्यात आले की जिन्यावरून फरफटत खाली आणले? या प्रश्नांबाबत पार्टीत उपस्थित असलेल्यांकडून वेगवेगळी उत्तरे मिळत असल्याने पोलिसांनी गुन्ह्याचा प्रसंग पुन्हा उभा करण्याचा निर्णय घेतला. जान्हवीला मारताना जखमी झालेल्या श्री याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. शुक्रवारी त्याचा रुग्णालयातून घरी सोडताच त्याला आणि दियाला घेऊन पोलिसांचे पथक भगवती हाइट्स इमारतीमध्ये पोहचले. जान्हवीची प्रतिकृती म्हणून तिच्याच वजनाच्या आणि उंचीच्या दोन बाहुल्या तयार करण्यात आल्या होत्या. जान्हवीने वडिलांचा वाढदिवस साजरा केल्यानंतर श्री आणि दिया तिला बोलाविण्यास आले. पार्टीमध्ये स्वतःची दारू स्वतः आणण्याचे ठरले होते.

३१ डिसेंबरला जे काही ठरले त्यानुसार पार्टीतील काहींना सोबत घेऊन शनिवारी जसाच्या तसा प्रसंग उभा करण्यात आला. जान्हवी घरातून निघाल्यापासून तिचा मृतदेह सापडेपर्यंतची घटना पुन्हा घडविण्यात आली. गच्चीवरून खाली येण्यासाठी लागलेला वेळ, वजन आणि उंचीनुसार श्री व दिया जान्हवीला फरफटत आणू शकतात का? दोघांनी कसे मारले असेल? हे सर्व करताना पोलिस, डॉक्टर आणि फोरेन्सिक तज्ज्ञांनी सर्व नोंदी टिपल्या.

ड्रग कनेक्शनचा तपास

पोलिसांनी एका ड्रग तस्कराला ताब्यात घेतले आहे. जान्हवीच्या हत्या प्रकरणाचा तपास करताना या तस्कराचे नाव पुढे आले. या तस्कराचे आणि पार्टीचे ड्रग कनेक्शन आहे का? याचा तपास पोलिस करीत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here