म. टा. विशेष प्रतिनिधी,

उपराजधानीतील डागा आणि मेयोच्या जुन्या इमारतींध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा नाही, केवळ एक्स्टिंग्युशरवर त्यांचे काम चालले आहे. शहरातील ३०० रुग्णालयांपैकी ६० रुग्णालयांतदेखील अग्निप्रतिबंधक सुविधा नसल्याने धोक्याच्या उंबरठ्यावर असल्याची माहिती पुढे येत आहे.

येथे झालेल्या दुर्घटनेनंतर, शहरातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला असता, काही धक्कादायक तथ्ये समोर आली आहेत. अग्निशमन यंत्रणा असल्याखेरीज कुठल्याच रुग्णालयास परवानगी दिली जात नाही. असे असतानादेखील नागपुरात अनेक रुग्णालये खुलेआम सुरू आहेत. मेयो, डागा रुग्णालयांच्या नव्या इमारतींमध्ये अशी यंत्रणा असली तरी जुन्या इमारतींमध्ये मात्र ती नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

‘जानेवारी व जुलै या दोन महिन्यांत शहरातील रुग्णालयांना स्वत:च फायर ऑडिट करून घ्यावे लागते. एखाद्या मान्यताप्राप्त संस्थेकडून प्राप्त ब प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. अन्यथा, अशा इमारती वा रुग्णालयांवर कारवाई करण्यात येते’, असे महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी स्पष्ट केले.

फायर ऑडिट म्हणजे नेमके काय?
एखाद्या इमारतीला आग लागली तर त्यावर नियंत्रण प्राप्त करण्यासाठी जी यंत्रणा आवश्यक असते, ती सक्षम असणे अपेक्षित असते. ती यंत्रणा अस्तित्वात आहे की नाही, हे तपासणे म्हणजेच फायर ऑडिट. यासाठी काही मानके ठरवून दिलेली आहेत. आग लागल्यास कुठली काळजी घ्यावी, याचे प्रशिक्षण इमारत अथवा संस्थेतील व्यक्तींना देणे बंधनकारक आहे.

हे आवश्यक…

पाण्याची टाकी, पंप, हायड्रन्ट्स, स्प्रिंन्कल्स, स्मोक अॅण्ड हिट डिटेक्टर्स या यंत्रणा असणे आवश्यक आहे. याशिवाय, संबंधित इमारतींना प्रमाणपत्रच दिले जात नाही.

आग लागू नये यासाठी…

इलेक्ट्रिक उपकरणे आयएसआय दर्जाची असावी. एका स्विचमध्ये केवळ एकाच जोडणीचा वापर व्हावा. हाउस कीपिंग अर्थात तेथे स्वच्छता असावी. विद्युत उपकरणे ज्वलनशील वस्तूंपासून दूर असावे, वातानुकूलित यंत्र असल्यास फायर डम्पर असावा. सर्किट ओव्हरलोड होणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्यक असते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here