: आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण बाळांच्या अतिदक्षता विभागातील यंत्रसामग्रीची राखरांगोळी केली. संपूर्ण परिसर धुराच्या लोटाने काळवंडला होता. आग विझविण्यासाठी धावलेल्या अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांच्या बुटांचे ठसे सर्वत्र दिसत होते. मृत्यूच्या त्या पाऊलखुणा भासत होत्या. एकाच टेबलवर एकसारख्या रंगातील कापडात गुंडाळून ठेवलेले चिमुकल्यांचे ते देह अंगावर काटा आणणारे होते.

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाला आग नेमकी कशामुळे लागली, हा काळजीचा विषय झाला आहे. तिथे उपलब्ध इलेक्ट्रिक यंत्रसामग्रीतून स्फोट झाला असावा, की ऑक्सिजन सिलिंडरमधून की अन्य कोणते कारण आहे, याचा शोध तज्ज्ञांची चमू घेत आहे. रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांना आग नियंत्रणाचे प्रशिक्षण दिले होते का, याची झाडाझडती तज्ज्ञांची चमू घेणार आहे. घटनेच्यावेळी रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या मनुष्यबळाच्या तत्परतेचेही ऑडिट केले जाणार आहे.

नागपूर येथील फॉरेन्सिक विभाग, व्हीएनआयटी आणि ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फायर इंजिनीअरिंग’चे तंत्रज्ञ दुपारी एकच्या सुमारास घटनास्थळी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सूचनेवरून पोहोचले. या चमूने घटनास्थळ सील केले. नवजात शिशूच्या शरीराचे आणि त्यांना अत्यावश्यक असलेल्या उपकरणांचे तापमान नियंत्रणात रहावे, यासाठी या कक्षात दोन वातानुकूलित यंत्रे लावण्यात आली आहेत. त्यापैकीच एका यंत्रामध्ये बिघाड होऊन ते शॉर्टसर्किट झाल्याची शक्यता घटनास्थळावर असलेल्यांनी बोलून दाखविली.

डॉक्टर, परिचारिका होते अनुपस्थित
नवजात बालकांच्या या अतिदक्षता विभागात डॉक्टर आणि पुरेशा प्रमाणात परिचारिका चोवीस तास नियुक्त असायला हवी असे नियम सांगतो. मात्र, ही घटना घडली त्या वेळी येथे एकही निवासी डॉक्टर वा परिचारिका नवजात शिशू दाखल असलेल्या वॉर्डात कर्तव्यावर तैनात नव्हती. ज्या दोन परिचारिका कर्तव्यावर होत्या त्या घटनास्थळापासून १५ फूट अंतरावरील वेगळ्या कक्षात झोपून होत्या.

‘फाइल अडली होती, चौकशी करू’

भंडारा : हा विभाग कार्यान्वित झाला तेव्हा अग्निशमनासंबंधीच्या नियमावलीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे विद्यमान यांनी मान्य केले. घटनास्थळाला भेट दिली असता ते बोलत होते. आग नियंत्रण आणि सुरक्षा नियमावलीनुसार सुरक्षा साधने उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव सादर झालेला असतानाही, तो मंजूर होऊन त्यावर अंमलबजावणी का झाली नाही, याचीही चौकशी कली जाईल, असेही टोपे यांनी सांगितले.

जिल्हा सामान्य रुग्णालयातील हा नवजात शिशू अतिदक्षता विभाग तत्कालीन आरोग्यमंत्री यांच्याहस्ते सेवेत दाखल करण्यात आले होते. कमी वजनाचे, श्वास घेण्यास अडचण असलेले अतिसंवेदनशील गटातील बाळ या अतिदक्षता वॉर्डातील एन्क्युबेटरमध्ये ठेवले जाते. ‘इन बॉर्न युनिट’ हे याच रुग्णालयात जन्माला आलेल्या बाळांसाठी तर, ‘आउट बॉर्न युनिट’ हे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्णालयांमधून आलेल्या बाळांसाठी आहे. मृत्युमुखी पडलेली बालके ही ग्रामीण भागातील होती.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here