म. टा. प्रतिनिधी, नागपूर: सुधार प्रन्यासच्या घरकूल योजनेत सदनिका मिळविण्यासाठी खोटी शपथपत्रे दाखल केल्याच्या आरोपाखाली चिमूरचे आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया (वय ३७ रा. श्रीराम पॅलेस,धंतोली) यांच्याविरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल केले. न्यायालयाच्या आदेशानंतर इमामवाडा व सक्करदरा पोलिसांनी ही कारवाई केली. अॅड. तरूण चतुरभाई परमार (वय ५५ रा. भूपेशनगर, पोलीस लाइन टाकळी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदर गुन्हे दाखल करण्यात आले.

भांगडिया यांनी मार्च २००७ ते जून २००८ या कालावधीत खोटी शपथपत्रे सादर करून उंटखान्यातील ‘नासुप्र’च्या लोक गृहनिर्माण योजनेंतर्गत एबी ३०३ क्रमांकाचा गाळा घेतला. प्रत्यक्षात ही योजना बेघरांसाठी होती. भांगडिया यांनी गैरमार्गाने मालमत्ता बळाकावून सार्वजनिक फसवणूक केल्याने इमामवाडा पोलिसांनी भांगडिया यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. तर ५ एप्रिल २००७ ते १६ मार्च २००९ या कालावधीत भांगडिया यांनी अशाच प्रकारे खोटे शपथपत्र सादर करून स्वत: अथवा कुटुंबातील सदस्यांच्या नावे घर, गाळे अथवा भूखंड नसल्याचा दावा करीत आयुर्वेदिक ले-आऊट येथील नासुप्रच्या घरकुल योजनेंतर्गत इमारत डीमधील २०२ क्रमांकाचा गाळा घेतला. या प्रकरणात सक्करदरा पोलिसांनी भांगडिया यांच्याविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

परमार यांनी भांगडिया यांनी गैरमार्गाने व खोटे शपथपत्र सादर करून नासुप्रच्या योजनेंतर्गत गाळे मिळविल्याची याचिका न्यायालयात दाखल केली. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी व्ही. एम. देशमुख यांच्यापुढे या प्रकरणाची सुनावणी झाली. अॅड. सतीष उके यांनी याचिकाकर्त्याची बाजू मांडली. न्यायालयाने या दोन्ही प्रकरणी बंटी भांगडिया यांच्याविरूद्ध गुन्हे दाखल करून तपासाअंती अहवाल न्यायालयापुढे सादर करण्याचे आदेश इमामवाडा व सक्करदरा पोलिसांना दिले. त्यानंतर पोलिसांनी भांगडिया यांच्याविरूद्ध गुन्हे दाखल केले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here