मुंबईः माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या काही नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा मोठा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. ठाकरे सरकारनं घेतलेल्या या निर्णयामुळं पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील मंत्र्यांना व नेत्यांना मिळणाऱ्या सुरक्षेविषयी आढावा घेण्यात आला होता. त्यानंतरच हा निर्णय घेतला असल्याचं सूत्रांकडून समजतंय. यावेळी भाजप नेत्यांसह इतर पक्षांच्या नेत्यांच्याही सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेविषयीचा अहवाल मुंबई पोलिसांनी सरकारला दिला होता. त्यामुळं फडणवीसांच्या सुरक्षेत कपात करु नका, असा अहवाल दिला असतानाही त्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात येणार आहे. टीव्ही ९नं यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा ताफ्यातील बुलेटप्रुफ गाडीही काढून घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आमदार प्रसाद लाड यांच्याही सुरक्षेत मोठी कपात केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते यांना असलेली झेड दर्जाची सुरक्षा काढून त्यांना आता वाय प्लस सुरक्षा देण्यात येणार असून त्यांची बुलेटप्रुफ गाडीही काढून घेण्यात येणार असल्याची माहिती समोर येतंय.

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिवीजा फडणवीस यांच्याही सुरक्षेत कपात करण्यात येणार आहे. याआधी अमृता फडणवीस यांना वाय दर्जाची सुरक्षा होती. तर नवीन आदेशानुसार आता त्यांना एक्स दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. त्याचबरोबर, रिपाइंचे नेते रामदास आठवले, भाजप आमदार आशिष शेलार, दिपक केसरकर यांच्याही सुरक्षेत कपात करण्यात आली आहे.

यांच्या सुरक्षेत वाढ

वकील उज्ज्वल निकम आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्या सुरक्षेत मात्र वाढ करण्यात आली आहे. निकम यांना झेड दर्जाची सुरक्षा तर शत्रुघ्न सिन्हा यांना वाय दर्जाची सुरक्षा एस्कॉर्टसह देण्यात आली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here