म. टा. प्रतिनिधी, नगरः शिर्डीच्या साईबाबा देवस्थान ट्रस्टचे प्रशासन आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्यात विविध मुद्द्यांवर उडणाऱ्या खटक्यांच्या पार्श्वभूमिवर शिर्डीतून नवी मागणी पुढे आली आहे. या संस्थानच्या विश्वस्त मंडळात निम्म्या जागा स्थानिकांना मिळाव्यात अशी मागणी करण्यात येऊ लागली आहे. राष्ट्रवादीने यासाठी पुढाकार घेतला असून महाविकास आघाडी सरकारच्या सत्ता वाटपात हे देवस्थान राष्ट्रवादी काँग्रेसकडे असावे, अशीही मागणी केली आहे.

शिर्डीच्या साईबाबा संस्थानवर सरकार नियुक्त विश्वस्त मंडळ असते. त्यामुळे राज्यभरातील आणि सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतील लोकांची यावर वर्णी लागते. अलीकडे वर्षभरापासून नव्या विश्वस्तांची प्रतीक्षा आहे. महाविकास आघाडीच्या सत्ता वाटपाच्या घोळात हा निर्णय अडकल्याचे सांगण्यात येते. मधल्या काळात शनिशिंगणापूरच्याबाबतीतही असाच कायदा करण्यात आला होता. मात्र, तो प्रत्यक्षात आलाच नाही. अलीकडेच तेथे जुन्याच कायद्याने नव्या विश्वस्त मंडळाची निवड झाली. त्यामुळे देवस्थान ट्रस्टवर स्थानिक ग्रामस्थांचाच ताबा राहिला.

तर दुसरीकडे शिर्डीत मात्र ग्रामस्थ विरूद्ध प्रशासन संघर्ष सुरू आहे. त्यामुळे आता शिर्डीतही विश्वस्त मंडळात स्थानिकांना जादा स्थान असावे, असा विचार पुढे आला आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या शिर्डी भेटीत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे ही मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश गोंदकर, तसेच बाबासाहेब कोते, सुधाकर शिंदे, महेंद्र शिंदे, संदीप सोनवणे यांनी ही मागणी केली. आघाडीच्या सत्ता वाटपात हे देवस्थान राष्ट्रवादी काँग्रेसकडे घ्यावे आणि त्यामध्ये स्थानिकांना पन्नास टक्के प्रतिनिधीत्व मिळावे, अशी मागणी त्यांनी केली. हा विषय आपण महाविकास आघाडीच्या समन्वय समितीसमोर मांडू, असे आश्वासन पटेल यांनी त्यांना दिले.

जिल्ह्यातील दुसरे शनिशिंगणापूर देवस्थान जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या रुपाने शिवसेनेच्या ताब्यात गेले आहे. त्यामुळे शिर्डीवर आता राष्ट्रवादीकडून दावा केला जात आहे. मागील सरकारच्या काळात हे देवस्थान भाजपकडे होते. शिर्डी नगरपंचायतीत सध्या ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपची सत्ता आहे. या मतदारसंघाचे आमदार विखेच आहेत, तर शिवसेनेचे सदाशिव लोखंडे खासदार आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हेही याच भागातून येतात. अशा राजकीय परिस्थितीत शिर्डीच्या देवस्थानवर राष्ट्रवादीने दावा सांगण्यास सुरवात केली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here