पुणे: पुणे-बेंगळुरू महामार्गावर साताराहून पुण्याकडे येणाऱ्या लेनवर येथे पाचशे मीटरच्या अंतरात आज चार अपघात झाले. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका सहा महिन्यांच्या बाळाचा समावेश आहे. (Four Accident at Narhe in Pune)

कात्रज बोगदा ओलांडून पुण्याच्या दिशेला येताना दरी पुलापासून नऱ्हेपर्यंत तीव्र उतार आहे. या उतारावर हे सर्व अपघात झाले आहेत. पहिला अपघात पहाटे साडेचार वाजता झाला. मद्याची वाहतूक करणाऱ्या कंटेनरने पुढील ट्रकला धडक दिली. त्यात एक जखमी आहे.

दुसरा अपघात त्याच ठिकाणी पहाटे साडेपाच वाजता झाला. त्यात मद्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकला कंटेनरची धडक बसली. यात मद्याची वाहतूक करणारा ट्रक सर्व्हिस रस्त्यावर पडला. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. राजू मुजूल्डे, अजय मुजूल्डे अशी मृतांची नावे असून हे दोघे भाऊ होते. ते मूळचे मध्य प्रदेशचे होते.

तिसरा अपघात सकाळी साडेआठच्या सुमारास भुमकर चौक येथे झाला. भाजीपाल्याची वाहतूक करणारा ट्रक सर्व्हिस रस्त्यावर उलटला आहे.

चौथा अपघात पावणेदहाच्या सुमारास पुन्हा त्याच ठिकाणी झाला. यामध्ये एका कंटेनरने अनुक्रमे रिक्षा, खासगी कार आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या वाहनाला धडक दिली आहे. त्यामध्ये रिक्षात बसलेले प्रवासी (आई आणि सहा महिन्यांचे बाळ) आणि रिक्षा चालक गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांच्या वाहनातील सहाय्यक फौजदाराला डोक्याला मार लागला. अपघातानंतर कंटेनर चालक पळून गेला.

वाकड येथेही अपघात

वरील चार अपघातांशिवाय कात्रज देहूरोड बायपासवर वाकड येथे एक भीषण अपघात झाला आहे. ट्रक आणि बसची धडक होऊन हा अपघात झाला असून, त्यात एकाचा मृत्यू झाला आहे. यात नऊ जण जखमी असून दोघे गंभीर आहेत.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here