मुंबईः ‘आमदार प्रताप सरनाईक यांच्याबाबत अनेक आरोप केले गेले. राज्यातील प्रमुख नेत्यांबाबत व माझ्या कुटुंबियांवरही आरोप केले यांच्यात हिंमत असेल तर आरोप सिद्ध करावे. नाहीतर ईडीच्या कार्यालयाबाहेर आरोप करणाऱ्यांना जोड्यानं मारलं नाही, तर माझं नाव नाही,’ असा गंभीर इशारा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.

कथित पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते यांनीही शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत. किरीट सोमय्यांनी केलेल्या या आरोपांनतर शिवसेना आक्रम झाली असून त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी या आरोपांवर उत्तर दिलं आहे.

‘ज्या पद्धतीने ही मंडळी आरोप करत सुटले आहेत. त्यातून काही निष्पन्न होणार नाही. काहीही कागद फडकावतात आणि आरोप करतात. माझ्या कुटुंबियावरही आरोप केले. यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी मी दिलेल्या मुदतीपर्यंत आरोप सिद्ध करुन दाखवावे. अब्रुनुकसानीचे खटले वगैरे ठीक आहे ते न्यायालयात जाईल पण आरोप सिद्ध झाले नाही तर ईडीच्या कार्यालयासमोर या आरोप करणाऱ्यांना जोड्यानं मारलं नाही तर माझं नाव संजय राऊत नाही हे मी आधीच सांगितलं आहे,’ असं बेधडक वक्तव्य राऊतांनी केलं आहे.

‘गेली अनेक वर्ष आम्ही राजकारण, समाजकारण आणि पत्रकारितेत काम करताना खूप काळजीपूर्वक काम केलंय. तुमच्यासारखे फडतूस लोक आमच्यावरती आरोप करत बसावेत आणि त्याबद्दल पक्षानं वाईट प्रसिद्धी मिळवावी यासाठी राजकारण, समाजकारण आणि पत्रकारिता आम्ही केली नाही,’ असंही राऊत म्हणाले आहेत.

‘ही कायद्याच्या पलिकडची भाषा असेलही, पण मला आणि माझ्या पक्षाला प्रतिष्ठा महत्त्वाची आहे. जर कायद्याच्या पलिकडेची भाषा असेल, तर ते कायद्याच्या पलीकडे जाऊन भाष्य करत आहेत. त्यांच्याकडे कायद्याची कोणती चौकट आहे? त्याच्या पक्षानं सांगावं, आमचा या व्यक्तीशी संबंध नाही असं सागावं. ही माकडं उड्या मारत आहेत त्यांच्याशी संबंध नाही असं त्यांनी सांगावं,’ अशी टीकाही त्यांनी केली आहे.

‘नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात कोणतंही राजकारण नाही. याआधी आमच्या सुरक्षादेखील काढण्यात आल्या होत्या. मागच्यावेळी आम्ही सरकारमध्ये असतानाही माझी सुरक्षा काढून घेतली होती, पण मी अजिबात तक्रार केली नाही. महाराष्ट्र सरकार जागरुक आणि संवेदनशील आहे. शरद पवारांनीही गरज नसेल तर सुरक्षा कमी करा असं सांगितलंय. आम्ही सगळ्यांनीच तेच सांगितलंय. जर महाराष्ट्र सुरक्षित असेल तर कशाला सिक्युरिटीचे पिंजरे घेऊन फिरायचे,’ असंही राऊतांनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here