सन २०१८ पासून टीव्हीएस कंपनी आपल्या ई-स्कूटरवर काम करत असून, दोन वर्षांपूर्वीच्या ऑटो-एक्स्पोमध्ये कंपनीने याचे प्रोटोटाइप मॉडेल सादर केले होते. आता वास्तविक उत्पादन कंपनीकडून बाजारात दाखल करण्यात आले आहे.
या स्कूटरची किंमत भारतीय बाजारात १.१५ लाख रुपये आहे. सुरुवातीच्या काळात ही स्कूटर केवळ बेंगळुरूमध्ये उपलब्ध असणार आहे. आगामी काळात ही स्कूटर देशभरात विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. टीव्हीएसची ही स्कूटर ग्राहक ऑनलाइन माध्यमातून नोंदवू शकतात.
टीव्हीएस आयक्यूब इलेक्ट्रिकमध्ये ४.४ केव्हीची इलेक्ट्रिक मोटार देण्यात आली आहे. या स्कूटरचा सर्वाधिक वेग ७८ कि.मी. प्रति तास असेल. संपूर्ण चार्ज झाल्यावर ही स्कूटर ७५ कि.मी. धावू शकेल. ही स्कूटर एकदा चार्ज करण्यासाठी ५ तासांचा वेळ लागणार आहे. ० ते ४० कि.मी. प्रति तास वेग गाठण्यास या स्कूटरला केवळ ४.२ सेकंदाचा अवधी लागेल, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.
हे विशेष फिचर या स्कूटरमध्ये देण्यात आले असून, या स्कूटरला डिजिटल डिस्प्ले देण्यात आला आहे. याशिवाय डे-टाइम रनिंग एलईडी लाइट, एलईडी हेडलॅम्प, एलईडी टर्न इंडिकेटर तसेच एलईडी स्टॉप लॅम्प, डिस्क ब्रेक यांसारखे अत्याधुनिक फिचर्स देण्यात आले आहेत. या स्कूटरला इकॉनॉमी आणि पॉवर असे दोन मोड देण्यात आले आहेत.
टीव्हीएस आयक्यूब इलेक्ट्रिकची टक्कर बजाजच्या ई-चेतक स्कूटरशी असणार आहे. अलीकडेच बजाजने चेतकचे ई-व्हर्जन बाजारात दाखल केले होते. बजाजच्या ई-चेतकच्या अर्बन व्हेरिएंटची किंमत एक लाख असून, प्रीमियम व्हेरिएंटची किंमत १.१५ लाख रुपये आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times