गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे. यावेळी पोलीस दलातील १२ हजार ५३८ विविध पदे तातडीने भरण्यात येणार असल्याचं बोललं जातंय. यात पहिल्या टप्प्यात ५ हजार ३०० जागांसाठी भरती होणार आहे तर उर्वरित जागांसाठी दुसऱ्या टप्प्यात भरती होणार आहे, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे. तसंच, १२ हजार ५३८ जागा भरल्यानंतरही गरज पडल्यास पोलीस खात्यात आणखी ५ हजार पदे भरण्याबाबत विचार करण्यात येईल, असा विश्वासही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, गृह विभागानं २०१९मध्ये पोलीस भरतीया निर्णय घेतला होता. मात्र, ९ सप्टेंबर २०२० मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एसईबीसी आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्याने पोलीस भरती प्रक्रिया लगेचच थांबवण्यात आली होती. त्यानंतर, पोलीस भरती २०१९ करिता एसईबीसी (SEBC) च्या ज्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहे, त्यांना मोठा दिलासा देण्यात येत असून गृह विभागाने ४ जानेवारी २०२१ रोजी निर्गमित केलेला शासन निर्णय रद्द करण्यात आला होता.
राज्यात पोलिसांची संख्या कमी आहे. त्यातच करोनामुळे पोलिसांवर कामाचा अधिकचा ताण आला आहे. शिवाय अनेक पोलिसांना करोनाची लागण झाली असून अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे सुद्धा पोलीस भरती करण्यात येत असल्याचं बोललं जातं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times