श्री साईबाबा मंदिर भाविकांसाठी १६ नोव्हेंबरला दर्शनासाठी खुले करण्यात आलेले आहे. मंदिरातील दर्शनाची सुविधा ही मर्यादित स्वरूपाची आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर दिवसभरात १५ हजार भाविकांना दर्शन दिले जाऊ शकते. त्यामुळे साईबाबा दर्शनासाठी येताना पुर्वनियोजन करुन व संस्थानचे online.sai.org.in संकेतस्थळावर ऑनलाइन बुकिंग करुन दर्शनास यावे, असे वारंवार आवाहन संस्थान प्रशासनाने सातत्याने केले आहे. मात्र त्यानंतरही श्री साईबाबांचे दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी विशेषतः गुरुवार , शनिवार , रविवार आणि इतर सण अथवा सुट्टयांचे दिवशी होत असल्याने दर्शन व्यवस्थेवर क्षमतेपेक्षा जास्त ताण येत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे आता संस्थानने मोठा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार शिर्डी येथे दर गुरुवारी, शनिवारी, रविवारी तसेच इतर सण व सुट्टयांचे दिवशी श्री साईबाबांचे दर्शनास भक्तगणांनी संकेतस्थळावर जाऊन सशुल्क व निशुल्क दर्शनपास / आरती पास आरक्षित करूनच येणे बंधनकारक आहे. या दिवशी म्हणजेच गुरुवार , शनिवार , रविवार तथा सुट्टया व सणांचे दिवशी भक्तांची अलोट गर्दी होत असल्याने श्री साईबाबा संस्थान शिर्डी येथील पास वितरण केंद्रे गर्दी नियंत्रण करण्यासाठी बंद ठेवण्यात येतील. शिर्डीत पायी पालख्यांचे प्रमाणही अभुतपूर्वरित्या वाढत आहे. त्यामुळे समस्त पालखी मंडळांनी देखील शिर्डीत पालख्या आणण्याचे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times