मुंबईः राज्यात आज दिवसभरात ४ हजार २८६ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळं राज्यात आजपर्यंत एकूण १८ लाख ६७ हजार ९८८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४. ७५ टक्के इतके झाले आहे.

राज्यात आज पुन्हा एकदा करोना रुग्णसंख्येच्या मोठी घट झाल्याचं दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णसंख्याचा आकडा सातत्याने वाढताना दिसत होता. त्यामुळं आरोग्य प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली होती. मात्र आरोग्य विभागानं आज जारी केलेल्या आकडेवारीनुसार आज करोनामुक्त रुग्णांची संख्या वाढल्यानं राज्याला काही अंशी दिलासा मिळाला आहे.

आज राज्यात २ हजार ४३८ नवे रुग्ण सापडले आहेत. करोना बाधित रुग्णांची राज्यातील एकूण रुग्णसंख्या १९ लाख ७१ हजार ५५२ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासांत ४० रुग्णांचा करोनामुळं मृत्यू झाला आहे. राज्यात करोनामुळं दगावलेल्या रुग्णांची आजपर्यंतची एकूण संख्या ५० हजार १०१ इतकी झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २. ५४ टक्के इतका आहे. ५२ हजार २८८ अॅक्टिव्ह रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १, ३४, ४३, २२९ चाचण्यांपैकी १९ लाख ७१ हजार ५५२ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ३० हजार ६९९ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत. तर, २ ४६८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहे.

ठाणे जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९१ टक्क्यावर
ठाणे जिल्ह्यात सोमवारी नवीन २८९ करोना रुग्णांची वाढ झाली. तर पाच रुग्ण दगावले. परंतु नवीन वाढलेल्या रुग्णापेक्षा दिवसभरात बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक होती. ३५८ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९१ टक्क्यावर गेले आहे. दरम्यान, आतापर्यंत ठाणे जिल्ह्यातील बाधितांची संख्या २ लाख ४७ हजार ४०२ वर इतकी झाली असून त्यापैकी २ लाख ३७ हजार २८९ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ४ हजार ८० रुग्ण उपचार घेत आहेत. करोनाबळींचा एकूण आकडा ६ हजार ३३ इतका आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here