कर्नाटकातील उत्तरा कन्नडा जिल्ह्यातल्या अंकोला तालुक्यातील एका गावाजवळ श्रीपाद नाईक यांच्या कारला भीषण अपघात झाला. या घटनेत श्रीपाद नाईक जखमी झाले. तर त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. जखमी झालेल्या नाईक यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानं हा अपघात झाल्याचं सांगण्यात येतंय. नाईक हे पत्नीसह येल्लापूरहून गोकर्णाला चालले होते. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कारमध्ये नाईक यांच्यासह एकूण चार जण होते.
या भीषण अपघातात श्रीपाद नाईक यांच्या पत्नीसह नाईक यांच्या स्वीय सहायकाचाही मृत्यू झाला आहे, अशी माहिती उत्तरा कन्नडा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शिवप्रकाश देवराजू यांनी दिली.
नाईक यांना योग्य उपचार द्यावेत, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना पंतप्रधान मोदींनी फोन केला. श्रीपाद नाईक यांना उपचारासाठी गोव्याला हलविण्यात आलं आहे.
दरम्यान, श्रीपाद नाईक यांच्या पत्नीच्या निधानावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी शोक व्यक्त केला आहे. तर श्रीपाद नाईक यांच्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना फोन केला. नाईक यांना योग्य उपचार देण्यात यावेत, असं राजनाथ सिंह म्हणालेत. तर गरज पडल्यास त्यांना पुढील उपचारासाठी विमानाने दिल्ली हलवावं, असंही राजनाथ सिंह यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना सांगितलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times