सिडनी, : आर. अश्विन आणि हनुमा विहारी यांनी तिसऱ्या सामन्यात चिवट फलंदाजी केली आणि भारताला पराभवापासून परावृत्त केले. पण सामना संपल्यावर अश्विन आणि विहारी जेव्हा ड्रेसिंग रुममध्ये गेले तेव्हा त्यांचे भारतीय संघाने कसे स्वागत केले, या गोष्टीचा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.

सामना संपल्यावर अश्विन आणि विहारी यांनी मैदानात खेळाडूंशी हस्तांदोलन केले. त्यानंतर अश्विन आणि विहारी भारताच्या ड्रेसिंग रुममध्ये गेले. भारताच्या ड्रेसिंग रुममध्ये यावेळी आनंदाचे वातावरण होते. यावेळी भारतीय संघातील सर्व खेळाडूंनी अश्विन आणि विहारी यांचे अभिनंदन केले. यामध्ये सर्वात अग्रस्थानी होता तो कर्णधार अजिंक्य रहाणे. अजिंक्यनंतर मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी अश्विन आणि विहारी यांचे अभिनंदन केल्याचे पाहायला मिळाले.

जखमी हनुमा विहारी आणि आर अश्विन या दोघांनी केलेल्या बचावात्मक फलंदाजीमुळे भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसरा कसोटी सामना ड्रॉ करण्यात यश मिळवले. पाचव्या दिवशी भारती संघाला विजयासाठी ३०९ धावांची गरज होती. ऋषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा यांच्या भागिदारीने भारताच्या विजयाची आशा निर्माण केली होती. पण ही जोडी बाद झाल्यानंतर हनुमा विहारी आणि आर अश्विन यांनी साडेतीन तासाहून अधिक वेळ आणि २५० हून अधिक चेंडू खेळून सामना वाचवला.

तिसरा कसोटी सामना ड्रॉ झाल्याने चार सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ १-१ अशा स्थितीत आहेत. त्यामुळे आता चौथ्या कसोटी सामन्यांवर सर्वांचे लक्ष लागलेले असेल. पण आता हनुमाची दुखापत बळावली असल्याचे म्हटले जात आहे. हनुमाची दुखापत गंभीर असून तो आता महिनाभर तरी क्रिकेट खेळू शकणार नाही, असे म्हटले जात आहे. त्यामुळे चौथ्या कसोटी सामन्यात हनुमा खेळणार नसल्याचेच चित्र सध्या दिसत आहे. पण याबाबतचा अधिकृत खुलासा अजूनही बीसीसीआयने केलेला नाही.

हनुमाला जर महिनाभर विश्रांती घ्यायची असेल तर त्याला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही खेळता येणार नाही, असे म्हटले जात आहे. कारण चार आठवडे विश्रांती घेतल्यावर हनुमाला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये जावे लागणार आहे. तिथे त्याच्या दुखापतीचे पुनर्वसन होणार आहे. त्यानंतर हनुमाची फिटनेस टेस्ट होणार आहे. तोपर्यंत इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका संपेल, असे म्हटले जात आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here