म. टा. प्रतिनिधी, सांगलीः कडकनाथ कुक्कुटपालन घोटाळ्यात नऊ लाख रुपयांची फसवणूक झालेल्या महिलेने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. नंदा हंबीरराव साळुंखे (रा. इस्लामपूर) असे मृत महिलेचे नाव आहे. कडकनाथ कुक्कुटपालनात फसवणूक झाल्याच्या नैराश्यातून नंदा यांनी आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या नातेवाइकांनी केला आहे. या घटनेची नोंद इस्लामपूर पोलिसात झाली आहे.
कडकनाथ संघर्ष समितीचे निमंत्रक कॉ. दिग्विजय पाटील यांनी नंदा साळुंखे यांच्या आत्महत्येची चौकशी करण्याची मागणी केली आहे. ‘राज्यातील कडकनाथ घोटाळयाकडे भाजपसह महाविकास आघाडीनेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे कडकनाथ घोटाळयाचा तपास थांबलेला आहे. घोटाळ्यातील दोषींवर तातडीने कारवाई करावी. अन्यथा या विरोधात रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा पाटील यांनी दिला आहे.’
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times