म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

करोना विषाणूमध्ये नव्या प्रकारचा संसर्ग विकसित झालेला दिसून येत आहे. या विकसित (म्युटेट ) झालेल्या करोना विषाणूचा एक वेगळा प्रकार टाटा कॅन्सर रुग्णालयामध्ये आढळून आला आहे. हा विषाणू ब्रिटनमधील विषाणूशी साधर्म्य दाखवणारा नाही. मात्र त्यातील काही जैविक रचना ही दक्षिण अफ्रिकेतील विषाणूशी मिळतीजुळती आहे. मात्र ती परिपूर्ण नसल्यामुळे हा विषाणू द. अफ्रिकेतील असल्याचाही निश्चितपणे दावा करता येणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

हा अभ्यास रुग्णालयाने सप्टेंबर महिन्यामध्ये केला होता. त्यात ७०० जणांचे आरटीपीसीआर नमुने घेण्यात आले होते. त्यामध्ये तीन जणांमध्ये या प्रकारचा विषाणू दिसून आला. मात्र तो आतापर्यंत नमूद केलेल्या देशांपैकी कोणत्याही देशातील विषाणूशी मिळताजुळता नाही. तसेच त्याचा संसर्ग धोकादायक नसून काळजी करण्यासारखे कारण नाही, असे टाटा रुग्णालयाचे डॉ. सुदीप गुप्ता यांनी ‘मटा’ला सांगितले. बाधा झालेले कॅन्सरग्रस्त रुग्ण नव्हते. रुग्णालयातील अंतर्गत वैद्यकीय विश्लेषणासाठी करण्यात आलेल्या अभ्यासामध्ये हे नमुने घेण्यात आले होते. या व्यक्तींमध्ये कोणत्याही परदेशी प्रवासाची पार्श्वभूमी नव्हती. त्यामुळे संसर्गाचे निश्चित लागण सांगता येणार नाही. या तिघांचीही प्रकृती व्यवस्थित असून दोन व्यक्ती पॉझिटीव्ह असल्या तरी त्यांना कोणत्याही प्रकारची लक्षणे नव्हती. करोना संसर्गाच्या पहिल्या प्रकारच्या विषाणूच्या प्रतिबंधासाठी देण्यात आलेली वैद्यकीय उपचार देण्यात आले. त्यांच्या लक्षणांमध्ये भिन्नता नव्हती, असे डॉ. गुप्ता यांनी सांगितले.

रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी लशीची मात्रा या प्रकारच्या विषाणूसंसर्गावर चालेल का अशी विचारणा केली असता त्याबद्दल आता निश्चित सांगता येणार नसल्याचे म्हटले. मात्र हे नमुने सप्टेंबर महिन्यात घेतले होते. जर ते वेगवान फैलाव करणारे असते तर आतापर्यंत अशा प्रकारच्या संसर्गाचे अनेक नमुने दिसले असते. प्रत्यक्षात तसे झाले नाही. त्यामुळे या प्रकारचा विषाणू संसर्ग हा तीव्र व धोकादायक नसल्याचे दिसून येते. लशीचा परिणाम या स्ट्रेनवर किती प्रमाणात होईल हे निश्चितपणे सांगता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

काळजी घ्या, ताण नको

करोना संसर्गाचे प्रमाण उत्तरोत्तर कमी होत आहे, त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. मास्क लावणे, सुरक्षित अंतराचे निकष पाळणे सुरू ठेवायला हवे. काळजी घ्या, मात्र ताण घेऊ नका. संसर्गाचे व करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाणही कमी झाले आहे, याकडे कॅन्सरतज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here