मुंबई: राज्यातील अनेक नेत्यांबरोबरच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारनं घेतला आहे. या निर्णयामुळं मनसैनिकांमध्ये संताप आहे. सरकारच्या या निर्णयाचा निषेध करत आता खुद्द मनसैनिकच राज ठाकरे यांच्या सुरक्षेसाठी सरसावले आहेत. आपल्या नेत्याच्या सुरक्षेसाठी मनसेनं पथकाची स्थापन केली आहे. ( activists will provide Security to )

मनसेनं राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका गांभीर्यानं लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर, राज्यात महापालिका निवडणुकाही होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तिथं काळ्या टी-शर्टमध्ये काही सैनिक दिसत होते. ‘महाराष्ट्र रक्षक’ असं त्यांच्या टी-शर्टवर लिहिण्यात आलं होतं. याबाबत पत्रकारांनी माहिती घेतली असता राज ठाकरे यांच्या सुरक्षेसाठी ही तयारी असल्याचं समजतं.

मनसेचे सरचिटणीस यांच्या पुढाकारानं हे पथक स्थापन करण्यात आलं आहे. यापूर्वीही राज्य सरकारनं राज यांची सुरक्षा काढली होती तेव्हा असंच पथक दिवसरात्र कृष्णकुंजवर तैनात करण्यात आलं होतं. आताही तसंच पथक स्थापन करण्यात आलं आहे. नयन कदम यांना याबाबत विचारलं असता ते म्हणाले, ‘मराठी माणसाच्या अस्मितेसाठी, मराठी भाषेसाठी आक्रमकपणे बोलणाऱ्या, मराठी जनतेच्या हिताची कामे करणाऱ्या राज साहेबांची सुरक्षा सरकारनं कमी केलीय आणि कंगनासारख्या नटीला, सरकारमधील मंत्र्यांच्या नातलगांना व बालिश मुलांना सुरक्षा दिली गेलीय. याचा आम्ही निषेध करतो. आमदार, खासदार लोकांची कामं करत असतील तर त्यांना भीती कशाला वाटायला हवी? राज ठाकरे हे सातत्यानं मराठी माणसांसाठी काम करतात. लोकांचे प्रश्न सोडवतात. त्यामुळं त्यांना सुरक्षेची गरज नाही. जे सोडवत नाहीत, त्यांना सुरक्षेची गरज लागते,’ असं नयन कदम म्हणाले.

‘राज्य सरकारनं राजसाहेबांची सुरक्षा कमी केली असली तरी मनसैनिक त्यांना सुरक्षा द्यायला समर्थ आहेत. मनसैनिकांचं हे महाराष्ट्र पथक जिथं कुठं साहेबांचे दौरे असतील तिथं आणि बंगल्यावर त्यांना सुरक्षा द्यायला तयार आहे,’ असं कदम यांनी स्पष्ट केलं.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here