शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी शिवभोजन योजनेच्या आजच्या पहिल्याच दिवशी लोकांनी तुडुंब प्रतिसाद दिला आहे. शिवभोजनाचा आज शुभारंभ झाल्यानंतर पहिल्याच दिवशी तब्बल ११,२७४ थाळींची विक्री झाली आहे. सध्या राज्यात १२५ केंद्रांवर शिवभोजन थाळीची व्यवस्था करण्यात आली आहे.
सर्वाधिक विक्री ठाणे, नाशिक या भागांमध्ये झाली आहे. गरीब आणि गरजू व्यक्तींना फक्त १० रुपये इतक्या कमी दरात जेवण उपलब्ध करून देण्यासाठी ही शिवभोजन योजना प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी १, ३५० थाळ्यांचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत महिलांना किंवा महिलांच्या बचत गटांना हे काम देण्यात येणार आहे. एका केंद्रावर कमीत कमी ७५ आणि जास्तीतजास्त १५० थाळ्यांचे वाटप होणे अपेक्षित आहे.
प्रत्येक जिल्ह्यासाठी १,३५० थाळ्यांचं लक्ष्य असताना नाशिकमध्ये १,००० तर ठाणे येथे १,३५० थाळ्यांची विक्री झाली आहे. जळगाव, अहमदनगर, सोलापूर विभागात प्रत्येकी ७०० थाळ्यांची विक्री झाली आहे. महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक वितरण विभागाकडून ही आकडेवारी प्राप्त झाली आहे.
दरम्यान, महत्त्वाकांक्षी शिवभोजन योजनेला आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सुरुवात करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यामध्ये, तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या योजनेचा मुंबईत शुभारंभ केला. ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे अशांनी या योजनेचा लाभ घेऊ नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्घाटनानंतर नागरिकांना केले.
ही योजना आजच सुरू करण्यात आली असून, या योजनेत सुरुवातीला काही त्रुटी असू शकतात असे पवार म्हणाले. मात्र या त्रुटी लगेचच दूर केल्या जातील असेही ते म्हणाले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times