मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात एका महिलेनं धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार अर्ज दिला होता. या प्रकरणानंतर धनंजय मुंडेंनी खुलासा केला आहे. कालपासून समाज माध्यमांमधून माझ्याविषयी काही कागदपत्र प्रसारित होत असल्याचे तसेच मीडिया व सोशल मिडियाद्वारे माझ्यावर बलात्काराचे आरोप करण्यात येत आहेत. सदर प्रकरणी एका महिलेने स्वतः त्यांच्या खात्यावरून ट्विट केले आहे. माझ्याविरुद्ध काही तक्रार दाखल केल्याचा उल्लेख त्या कागदपत्रांमध्ये दिसून येतो . हे सर्व आरोप खोटे माझी बदनामी करणारे आणि मला ब्लॅंकमेल करणारे आहेत, असं खुलासा मुंडे यांनी केला आहे.
‘एका महिलेसोबत मी २००३ पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी व मित्र परिवार यांना अवगत होती. सदर परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे, ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली आहे, असंही या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
‘सदर महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे त्यांची मी सर्वोतोपरी पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र, २०१९ पासून सदर महिला व त्यांची बहीण यांनी मला ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. माझ्या जीवाला गंभीर शारीरिक इजा करण्याच्या, धोका करण्याच्या धमक्या सुद्धा देण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा देखील सहभागी होता. या बाबत १२ नोव्हेंबर २०२० रोजी मे २०१९ पासून घडत असलेल्या या सर्व बाबींसंदर्भात पोलीसांकडे तक्रार सुद्धा देण्यात आलेली आहे,’ अशी माहिती त्यांनी दिली आहे.
‘कालपासून तक्रारदार महिलेनं माझ्या विरुद्ध खोटे आणि बदनामीकारक व माझ्यावर लग्नाच्या बहाण्याने बलात्कार केल्याचा आरोप केल्याची पोस्ट प्रसारित करण्यास सुरुवात केली आहे. तसेच त्यांनी या संदर्भात विविध प्राधिका-यांकडे केलेल्या तक्रारीच्या प्रति देखील समाज माध्यमातून प्रसारित केल्या आहेत. या सर्व तक्रारी खोट्या आहेत. मला ब्लॅकमेल करणे व माझ्या कडून खंडणी वसूल करण्याच्याच योजनेचा एक भाग आहे,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.
‘सदर महिलेनं मोबाईल वरून मला ब्लॅंकमेलिंग कोट्यवधी रुपये मागितल्याचे एसएमएस रुपी पुरावे आहेत. तसेच मी मा. उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमध्ये सदर महिलेच्या सोयीने प्रकरण सेटल करावे या साठीच्या दबाव तंत्रासाठीचा सुद्धा हा भाग असू शकतो. हे संपूर्ण प्रकरण हे ब्लॅकमेलिंग करणारे, खोटे व बदनामी करण्याच्या हेतूने घडवून आणण्यात आलेले आहे, त्यामुळे यात अशा आरोपांवर विश्वास ठेवू नये,’ अशी विनंती धनंजय मुंडे यांनी केली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times