नवी दिल्ली: लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी मंगळवारी वार्षिक पत्रकार परिषदेत माहिती दिली. उत्तर सीमेवर अलर्ट जारी केलेला आहे आणि कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यास आम्ही तयार आहोत, असा इशारा जनरल नरवणे यांनी चीनला दिला आहे. पश्चिम सीमेवर पाकिस्तानच्या पूर्वीप्रमाणेच कुरापती सुरूच आहे. पण अशा प्रकारच्या दहशतवाद्यांच्या घुसखोरीचे प्रकार खपवून घेणार नाही हे आम्ही आधीच स्पष्ट केलं आहे, असं जनरल नरवणे म्हणाले.

आम्ही उत्तरेला चीन सीमेवर अलर्ट आहोत आणि कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी सज्ज आहोत. चीनसोबत चर्चेच्या आठ फेऱ्या झाल्या असून आता नववी बैठकही घेण्यात येणार आहे. हा वाद वाटाघाटीद्वारे सोडवला जाईल, अशी अपेक्षा आहे. अन्यथा आम्ही कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज आहोत. हे संपूर्ण वर्ष उत्तर सीमा आणि कोविड -१९ च्या आव्हानांनी भरलेलं होतं. आम्ही या दोघांचा सामना केला. अतिशय कमी कालावधीत आम्ही सीमेवर सैन्य तैनात केलं आणि सर्व राज्ये व नागरिकांना करोना संकटात मदत केली. क्वारंटाइन कॅम्पही तयार केले, असं जनरल नरवणे म्हणाले.

भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी सैन्यात बदल केले जात असून तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रीत केलं जात आहे. सैन्याच्या आधुनिकीकरणासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी आवश्यक बजेटही मिळाला आहे. आमची ऑपरेशनल तयारी पुरेशी आहे आणि जवानांचं मनोधैर्यही उंचावलं आहे. पूर्वीच्या तुलनेत आपली क्षमताही बरीच वाढली आहे आणि थंडीपासून बचावासाठी उपाययोजना केल्या आहेत, अशी माहिती जनरल नरवणे यांनी दिली.

आपल्या सीमेवर जिथे जिथे धोका आहे तिथे आम्ही सतत सुरक्षेचा आढावा घेतो. त्यानुसार जवानांची तैनाती केली जाते. माहितीच्या आधारावर रणनिती ठरवली जाते. चीन आणि पाकिस्तानकडून धोका आहे, यात कुठलीही शंका नाही, असं जनरल नरवणे यांनी स्पष्ट केलं.

दरवर्षी चिनी सैन्य प्रशिक्षणासाठी पुढे येतं, नंतर ते निघून जातात. पण वादग्रस्त ठिकाणांवरून कुणीही मागे हटलेलं नाही. पूर्व लडाखमधील तणावाच्या स्थितीत कोणताही बदल झालेला नाही. परस्पर विश्वासातून आणि चर्चेतूनच मार्ग निघेल. त्यानंतर आघाडीवरून सैन्य मागे हटले जाईल, असं जनरल नरवणे यांनी स्पष्ट केलं.

चिनी कोणत्या भागात आहेत याबद्दल आमच्याकडे माहिती होती. पण अचानक कोणी कुरापत केल्यास त्याचा अंदाज लावणं कठीण असतं. पहिल्यांना चिन्यांनी हालचाली केल्याने अ‍ॅडव्हान्टेज त्याच्याबरोबर होता. तर ऑगस्टमध्ये आपण वरचढ होतो. हिवाळा असो किंवा उन्हाळा, आपली जागा सोडायची नाही, असे निर्देश सरकारने दिले आहेत. वाटाघाटीद्वारे निर्णय घेण्यात येईल. चर्चेतून आपण लक्ष्य गाठू शकू, असा विश्वास नरवणे यांनी व्यक्त केला आहे. उंच ठिकाणांवर सुविधा वाढवल्या आहेत. यामुळे थंडीतील नुकसान कमी झाले आहे. आपण आधीच तयारी केली होती, असं ते म्हणाले.

पूर्व लडाखच्या परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. इतर भागातही देखरेख ठेवली जाते. या भागातही चीनने बांधकाम केलं आहे. यामुळे या संपूर्ण प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून आहोत, असं लष्कर प्रमुख जनरल मनोज एम. नरवणे म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here