नवी दिल्लीः करोना व्हायरसचा प्रादुर्भाव पूर्वीपेक्षा कमी होत आहे. या व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगातील अनेक देशांनी लस बनवली आहे. भारताने सध्या दोन करोना लसींना ( coronavirus vaccine ) मंजुरी दिली आहे. याशिवाय सरकारने रशिया आणि चीनच्या लसींचीही ऑर्डर दिली आहे. त्यांची किंमत मंगळवारी पत्रकार परिषदेत आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.

केंद्र सरकारने सीरम संस्थेला १ कोटी १० लाख डोसची ऑर्डर दिली आहे. सीरमच्या लसची किंमत प्रति डोस २०० रुपये आहे (कर वगळता). त्याचबरोबर भारत बायोटेकच्या ‘कोवॅक्सिन’ लसच्या ३८ लाख डोसची ऑर्डर देण्यात आली आहे. यापैकी १२ लाख डोस भारत सरकारला विनामूल्य देण्यात येणार आहेत. या लसची सरासरी किंमत प्रति डोस २०६ रुपये असेल (कर वगळता), अशी माहिती सरकारने दिली.

फायझर आणि बायोएन्टेकच्या लसच्या एका डोसची किंमत १४३१ रुपये आहे. मॉडर्ना लसच्या एका डोसची अपेक्षित किंमत २३४८ ते २७१५ रुपये असेल. चिनी लसच्या एका डोससाठी ५६०० रुपयांपेक्षा जास्त पैसे द्यावे लागतील. तर भारतात लसची किंमत प्रति डोस २०० रुपये ठेवली गेली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी दिली. लसींच्या सर्व किंमती या सरकारसाठी आहेत. सरकार या किंमतीत कंपन्यांकडून लस खरेदी करत आहे.

कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसींच्या आपत्कालीन वापरासाठी सरकारने मंजुरी दिली आहे. दोन्ही लस संरक्षणात्मक आणि रोगप्रतिकारक असल्याचं सिद्ध झालं आहे, असं भूषण म्हणाले. देशात करोनावरील लसीकरण मोहीम १६ जानेवारीपासून सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम असेल, असं म्हटलं आहे.

कोरोनाबद्दल चिंता

जगात करोनाबाबत चिंताजनक परिस्थिती अजूनही आहे. एका दिवसात ४ लाख नवीन रुग्ण आढळून आले आहेत. ब्रिटनमध्ये ६८०००, ब्राझीलमध्ये ८७००० आणि रशियामध्ये २९००० नवीन रुग्ण आढळले आहेत. तर भारतात १२,५८४ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या देशातील एकूण रुग्णांपैकी ४३.९६ टक्के रुग्ण हे हॉस्पिटल्स किंवा इतर आरोग्य सेवांमध्ये उपचार घेत आहेत. तर ५६.४ टक्के होम आयसोलेशनमध्ये आहे. फक्त २ राज्यांमध्ये ५० हून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. केरळ आणि महाराष्ट्रात हे रुग्ण आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here