नवी दिल्ली: नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील जनतेचा रोष आता रस्त्यावरून मंत्र्यांच्या समोरही व्यक्त होऊ लागला आहे. आज थेट केंद्रीय गृहमंत्री यांच्यासमोरच एका तरुणाने सीएएला विरोध करत हा कायदा मागे घेण्याची मागणी केली असता जमावाने या तरुणाला प्रचंड मारहाण केली. मात्र शहा यांनी मध्यस्थी केल्याने शहा यांच्या सुरक्षा रक्षकांनी या तरुणाची जमावाच्या तावडीतून सुटका केली.

नवी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अमित शहा आज बाबरपूर परिसरात आले होते. या ठिकाणी ते एका जाहीर सभेला संबोधित करत असतानाच एका तरुणाने भरसभेत उभं राहून नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात घोषणा देत हा कायदा मागे घेण्याची मागणी केली. त्यामुळे सभेला आलेल्या लोकांनी तात्काळ या तरुणाला पकडले आणि त्याला चोप द्यायला सुरुवात केली. सभेत अचानक सुरू झालेल्या या प्रकाराची शहा यांनी दखल घेत या तरुणाची सुटका करण्याचे आदेश सुरक्षा रक्षकांना दिले. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी या तरुणाला जमावाच्या तावडीतून सोडत सभेच्या ठिकाणाहून बाहेर नेऊन सोडले. त्यानंतर शहा यांनी उपस्थितांना शांत राहण्याचं आवाहन केलं.

… तर दिल्ली सुरक्षित राहणार नाही

त्यानंतर शहा यांनी सीएएच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि आप नेते अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणलेल्या कायद्याला विरोध केला आहे. त्यांनी दिल्लीत दंगली घडवून लोकांना भडकावण्याचं काम केलं. अशा लोकांना पुन्हा निवडून दिलं तर दिल्ली सुरक्षित राहणार नाही, असं शहा म्हणाले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या कामांचं कौतुक करतानाच केजरीवाल यांच्या कामाचा पंचनामाही केला. मोदी चांगलं काम करत असल्याने काँग्रेससह विरोधकांची पोटदुखी होत असल्याची टीकाही त्यांनी केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here