म. टा. प्रतिनिधी

फोर्ट: मुंबईतील मराठी माणसापासून परदेशातून येणाऱ्यांपर्यंत अनेकांची मुंबईतील इराणी कॅफेशी खास नाळ जोडली गेली आहे. फोर्टच्या याझदानी बेकरीशीही असेच वेगळे नाते आहे. या याझदानी बेकरीचे झेंड यांचे रविवारी वृद्धापकाळाने वयाच्या ८६व्या वर्षी निधन झाले आणि शहरातील एक सर्वोत्तम बेकर गमावल्याची भावना मुंबईकरांमध्ये निर्माण झाली.

झेंड यांनी १७व्या वर्षी वडील मेहेरवान झेंड यांच्या हाताखाली बेकरीमध्ये काम सुरू केले. तेव्हापासूनचा हा प्रवास रविवारी थांबला. मूळचे इराणी व मुंबईत जन्मलेले झेंड हे बॉक्सिंग चॅम्पियन होते. त्यांच्या हॉटेलच्या भिंतीवरील फोटोंमधून त्यांचे बॉक्सिंगबद्दलचे प्रेम व्यक्त होते. त्यांना इंग्रजी काव्य खूप आवडायचे, असे त्यांचे मित्र दीपक राव सांगतात. मुंबईमध्ये लोकप्रिय असलेल्या बन, ब्रुन, लादी पाव यापलीकडे त्यांनी विचार केला. बेकरीवरील त्यांचे प्रेम कायम होते. त्यांनी अनेक वर्षे पार्किन्सन्स आजारावर मात करत बेकरीच्या काऊंटरवरून ग्राहकांचे हसतमुखाने स्वागत केले.

झेंड यांच्या वडिलांनी रायझिंग स्टार बेकरीमध्ये नोकरी केली. ही बेकरी कुलाबा मिलिटरी कॅम्पपासून चेंबूर नाक्यापर्यंत अनेक ठिकाणी पाव, केक, पेस्ट्री पुरवायची. त्यानंतर त्यांनी १९५०मध्ये सुरू केली. भट्टीत खरपूस भाजलेले पाव, चीज-गार्लिक बन, चॉकलेट ब्रेड, स्विस रोल, हॉट डॉग, साधे पाव अशा वैविध्यपूर्ण पद्धतीच्या पदार्थांचे अनेक जण चाहते झाले. हे पदार्थ मंत्रालय, बॉम्बे जिमखाना येथेही उपलब्ध व्हायचे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here