म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

बॉलीवूड अभिनेता सोनू सूदने आपल्या जुहूमधील निवासी इमारतीत आवश्यक परवान्याविना आणि परवानगीविना हॉटेल सुरू केल्याचे सुस्पष्ट असतानाही न्यायालयातील याचिकेच्या माध्यमातून आणि न्यायालयीन प्रक्रियेचा दुरुपयोग करत हे बेकायदा हॉटेल अधिकृत करण्याचा त्याचा प्रयत्न आहे, असा आरोप मुंबई महापालिकेने मुंबई उच्च न्यायालयात आपल्या प्रतिज्ञापत्राद्वारे केला आहे. या प्रकरणात आज, बुधवारी उच्च न्यायालयात न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर पुढील सुनावणी होणार आहे.

सोनूने जुहूमधील ए. बी. नायर मार्गावरील आपल्या मालकीच्या ‘शक्तिसागर’ या निवासी इमारतीला निवासी हॉटेलमध्ये रुपांतरित करण्यासाठी मुंबई महापालिकेची आवश्यक परवानगी न घेताच इमारतीत अंतर्गत बदल व अतिरिक्त बांधकामे केले, असा आरोप आहे. मुंबई महापालिकेने नोटीसच्या प्रक्रियेनंतर २४ ऑक्टोबर २०२० रोजी याविषयी पाडकामाचा आदेश काढल्यानंतर सोनूने दिंडोशी दिवाणी न्यायालयात दावा दाखल करून तातडीचा अर्ज केला होता. मात्र, दिवाणी न्यायालयाने तो फेटाळल्याने सोनूने उच्च न्यायालयात त्याविरोधात अपिल करून संरक्षणासाठी तातडीचा अर्ज केला आहे. त्यात उच्च न्यायालयाने पालिकेचे उत्तर मागितले होते. त्यानुसार, पालिकेने ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांच्यामार्फत मंगळवारी प्रतिज्ञापत्र दाखल केले.

‘अपिलकर्त्याने () त्याच्या इमारतीत मंजूर आराखड्याचे उल्लंघन करत पूर्णपणे बदल केला आहे. शिवाय त्यात परवान्याविनाच हॉटेल सुरू केले आहे. इमारतीच्या वापरात बदल करण्यासाठी पालिकेने परवानगी दिलेली नसून व्यावसायिक हॉटेलसाठी परवानाही दिलेला नाही. इमारतीतील बेकायदा बदल व नियमबाह्य अतिरिक्त बांधकामांविषयी पालिकेने सप्टेंबर-२०१८मध्ये प्रथम कारवाई केली होती. तरीही त्याने काम सुरूच ठेवले. त्यामुळे पालिकेने १२ नोव्हेंबर २०१८ रोजी पुन्हा बेकायदा बांधकाम तोडले. तरीही बेपर्वाई दाखवत त्याने तोडलेले बांधकाम पुन्हा केले आणि मूळ बांधकामात पुन्हा बदल सुरू केले. त्यामुळे १४ फेब्रुवारी २०२० रोजी पालिकेने पुन्हा तोडकामाची कारवाई केली. त्यामुळे अपिलकर्ता हा बेकायदा कामे करण्यासाठी सरावलेला दिसत आहे. या इमारतीची मालकी सोनू व त्याची पत्नी सोनालीकडे असल्याचे कागदपत्रेही त्याच्याकडून दाखवण्यात आलेले नाहीत’, असे पालिकेने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here