बर्ड फ्लूने अनेकदा पृथ्वीवर थैमान घातले आहे. १९९६ मध्ये ग्वानडाँग हा विषाणू- चीनमधून पाळीव बदकांकडून आशियात आला. १९८३ मध्ये अमेरिकेत पेनसिलव्हिया, १९९४ मेक्सिको, १९९९ इटली, २००३ नेदरलँड, २००४ ब्रिटिश कोलंबिया, कॅनडा, २००५ चीन, २००६ आफ्रिका, २०१५मध्ये अमेरिकेत आला होता. या नंतर दरवर्षी जगात कुठे ना कुठे तरी थंडीच्या हंगामात बर्ड फ्लू डोकावतो आहे. भारतात २००६ मध्ये नवापूर येथे पहिल्यांदा बर्ड फ्लू आला होता. तेव्हापासून दरवर्षी तो थंडीत हजर होतो. या वर्षी हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि केरळमध्ये सुरुवातीला पसरला. आता तो महाराष्ट्रात आला आहे.

ऐतिहासिक संदर्भ शोधल्यास बर्ड फ्लू किमान शंभर वर्षांपासून असल्याच्या नोंदी मिळतात. अगदी काही साथींमध्ये फ्लूचा विषाणू स्वतःमध्ये बदल करून तो घातक झाल्याचे आढळून आले होते. १९१८ मध्ये स्पॅनिश फ्लूचा उद्रेक युरोपात झाला, तेव्हा लाखो माणसे दगावली होती. पुढे १९५७ मध्ये आशियाई फ्लूमुळे, १९६८ मध्ये हाँगकाँग फ्लूमुळे, २००९मध्ये स्वाइन फ्लूने, तर २०१८ मध्ये चिनी फ्लूने माणसांचा बळी घेतल्याची उदाहरणे आहेत; पण हे सगळे अपवाद असल्याचे संशोधकांचे मत आहे.

बर्ड फ्लूचे कूळ

पूर्वी पक्ष्यांच्या फ्लूला ‘फाउल फ्लू’ म्हणायचे. शेफर या शास्त्रज्ञाने हा विषाणू ” प्रकारचा असल्याचे सिद्ध केल्यानंतर त्याचे नाव बदलले. यानंतर तो बर्ड फ्लू या नावाने ओळखला जात आहे. बर्ड फ्लू हा विषाणू ऑर्थोमिक्झो – व्हायरस कुळातील. आर्थोमिक्झोचे ए, बी आणि सी तीन प्रकार आहेत. हा आर-एन-ए विषाणू असतो आणि त्यातील एक प्रकारचा विषाणू अनेक प्रकारच्या पक्ष्यांना आजारी करतो. बर्ड फ्लू कमी घातक (लो पॅथॉजेनिक) किंवा घातक (हायली पॅथजनिक) अशा दोन प्रकारचा असतो. या विषाणूच्या पृष्ठभागावर एच व एन या प्रकारची प्रथिने असतात आणि त्यांच्यावरूनच त्यांना विविध नावे दिली आहेत.

कोणाला होतो बर्ड फ्लू?

स्कोलोपॅसिडी, लॅरिडी, गॅलिडी या कुळातील पक्ष्यांना बर्ड फ्लूचा धोका अधिक आहे. बदक, हंस, गूज, कुरव, पाणथळ पक्षी, कोंबड्या, लावे या पक्ष्यांचा या कुळात समावेश होत असल्याने त्यांना बर्ड फ्लूचा धोका असतो. हे पक्षी पाळीव पक्ष्यांच्या संपर्कात आले, की विषाणूचा प्रादूर्भाव वाढत जातो. लागण झालेल्या पक्ष्यांना मारून आणि जाळून विल्हेवाट लावतात. बर्ड फ्लूच्या निदानासाठी पक्ष्यांची विष्ठा, रक्त किंवा श्वासनलिका किंवा गुदद्वारातून नमुने पीसीआर किंवा कल्चर करून विषाणूचा प्रकार निश्चित केला जातो. ‘अँटीबॉडी टेस्टिंग’द्वारे आजार झालेला कळतो.

बर्ड फ्लू नियंत्रणासाठी कोंबड्यांचे लसीकरण उपयुक्त ठरले आहे. एच ७ एच ८ विषाणूसाठी लागण झालेले पाळीव पक्षी मारणे, स्वच्छता पाळणे, खुराडी साबणाच्या पाण्याने नियमित धुणे, मांस नीट शिजवून खाणे, मुक्त पक्ष्यांचे; तसेच पाळीव पक्ष्यांचे सर्वेक्षण सतत करणे गरजेचे आहे. पाणथळ जागांत गरज नसताना फिरणे टाळायला हवे. या पक्ष्यांच्या सतत संपर्कात असलेल्यांनी सर्दी, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी, जुलाब झाल्यास लगेच वैद्यकीय सल्ला घ्यावा.

करोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर ‘बर्ड फ्लू’ची अधिक भीती वाटणे साहजिक आहे; पण हे लक्षात ठेवायला हवे, की भारतात आजपर्यंत बर्ड फ्लू एकदेखील मनुष्य बळी घेतलेला नाही. त्यामुळे दक्ष राहा. पाणवठ्यावर, कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी एकापेक्षा अधिक पक्षी मृतावस्थेत आढळल्यास वन विभाग, पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधा. अफ‌वांवर विश्वास ठेवू नका.

– डॉ. सतीश पांडे, पक्षितज्ज्ञ

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here