म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यात लातूर, परभणी आणि बीड या ठिकाणी ”मुळे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे भोपाळस्थित राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेच्या तपासणीत आढळून आले आहे; परंतु अंडी व चिकन ७० अंश सेंटिग्रेड तापमानावर ३० मिनिटे शिजवून खाल्यास विषाणू निष्क्रिय होत असून, अंडी व मांस खाणे पूर्णपणे सुरक्षित आहे, असा निर्वाळा राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी मंगळवारी दिला. भारतात हा आजार मनुष्यात संक्रमित झाल्याचे एकही उदाहरण नाही. त्यामुळे भीती बाळगण्याचे कारण नसून, या रोगाबाबत गैरसमज आणि अफवा पसरवू नका, असे आवाहनही त्यांनी केले.

हिमाचल प्रदेश, राजस्थान, केरळ, मध्य प्रदेशपाठोपाठ राज्यातही बर्ड फ्लू रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. त्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे, सहआयुक्त डॉ. विनायक लिमये आदी अधिकारी उपस्थित होते.

राज्यात गेल्या २४ तासांत यवतमाळ, अमरावती, अकोला जिल्ह्यात २१४ कोंबड्या आणि चार कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. या सर्व पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी भोपाळ आणि पुण्यातील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, तपासणीचे निष्कर्ष हाती येण्यास दोन ते तीन दिवस लागणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

आठ जानेवारीपासून आतापर्यंत एक हजार ८३९ विविध पक्ष्यांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यांचे नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी परभणी जिल्ह्यातील मुरुंबा (हायली पॅथोजेनिक एव्हियन एन्फ्लूएन्झा – एच ५ एन १ स्ट्रेन) आणि लातूरमधील अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी येथील पोल्ट्री फार्ममधील नमुनेही पॉझिटिव्ह आल्याने हा परिसर संसर्गग्रस्त क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. या पोल्ट्री फार्मपासून एक किमी त्रिज्येतील सर्व कोंबड्या नष्ट करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. मुरुंबा येथील साडेपाच हजार, तर केंद्रेवाडी येथील १० हजार कोंबड्यांची विल्हेवाट लावली जाणार आहे. मुंबई, ठाणे जिल्ह्यातील घोडबंदर, दापोली या ठिकाणचे मृत कावळे, बगळे यांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत, तर बीडमधील नमुने (एच ५ एन ८) पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे या ठिकाणी सर्वेक्षण सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन आयुक्तांनी सांगितले.

मानवी संक्रमणाची मोजकी उदाहरणे

गेल्या २० ते २५ वर्षांत जगभरात ८४५ जणांना बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याचे आढळून आले असून, यापैकी ५४१ जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात २००६ मध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळून आला असून, अद्याप एकाही भारतीयाला या आजाराचा संसर्ग अथवा मृत्यू झाल्याचे आढळून आलेले नाही, असेही पशुसवंर्धन आयुक्तांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्लूएचओ) आकडेवारीच्या हवाल्याने सांगितले. चिकन विक्रेत्यांनी मास्क, हँड ग्लोव्ह्ज, अॅप्रन वापरावे, असे आवाहनही त्यांनी केले.

…तर संपर्क साधा

कावळे, पोपट, बगळे, स्थलांतरित पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचे आढळल्यास किंवा व्यावसायिक पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्यांचे मृत्यू नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात होत असल्याचे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात माहिती द्या किंवा पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या १८००२३३०४१८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा. मृत पक्षांना हात लावू नका किंवा त्यांची परस्पर विल्हेवाट लावू नका.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here