वृत्तसंस्था, नवी दिल्ली : ‘कोव्हिड १९’च्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे सर्वसामान्यांनी रोख रकमेच्या व्यवहारांना प्राधान्य दिल्याचे दिसून आले आहे. त्याचमुळे चालू आर्थिक वर्षाच्या (२०२०-२१) पहिल्या नऊ महिन्यांमध्ये १३ टक्के अधिक रोकड बाजारात आली. रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) ताज्या अहवालानुसार एक जानेवारी २०२१ रोजी २७ लाख ७० हजार ३१५ कोटी रुपयांची रोकड व्यवहारात होती. ३१ मार्च २०२० रोजी २४ लाख ४७ हजार ३१२ कोटी रुपयांची रोकड बाजारात होती. वर्षभरापूर्वी याच कालावधीतील रोख रकमेच्या तुलनेत यंदा सहा टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे.

‘केअर रेटिंग्ज’चे मुख्य अर्थतज्ज्ञ मदन सबनवीस यांच्या मते चालू आर्थिक वर्षात बाजारातील रोकड उच्चांकी पातळीवर गेली. त्यांच्या मते लॉकडाउन कालावधीत महत्त्वाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात रोख रकमेवर भर दिला. ज्या वेळी आर्थिक संकटाची परिस्थिती निर्माण होते, त्या वेळी घरोघरी रोख रक्कम जमा करण्याचे प्रमाण वाढते, असे निरीक्षणही त्यांनी नोंदवले. त्याचमुळे रोख रकमेच्या मागणीत वाढ झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

रिझर्व्ह बँकेने ऑगस्ट २०२०मध्ये आर्थिक वर्ष २०१९-२०साठीचा अहवाल सादर केला होता. त्यामध्ये करोनामुळे अनिश्चितता वाढली असून, त्याचा परिणाम बाजारातील रोकड वाढण्यात झाल्याचे नमूद करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने वाढत्या चलनाच्या मागणीवर नियंत्रण आणण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या होत्या.

पाच लाख कोटी रुपयांची वाढ
रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार वर्ष २०२०मध्ये बाजारांतील रोकड २२.१ टक्क्यांनी वाढली. त्यामुळे बाजारातील एकूण रोकड ५ लाख १ हजार ४०५ कोटी रुपयांनी वाढून १ जानेवारी २०२१ला २७ लाख ७० हजार ३१५ कोटी रुपयांवर पोहोचली. बाजारातील रोकडीमध्ये नोटा आणि नाण्यांची गणना केली जाते. सध्या रिझर्व्ह बँकेतर्फे २, ५, १०, २०, ५०, १००, २००, ५०० आणि २००० रुपयांच्या नोटांची निर्मिती केली जाते. याशिवाय ५० पैसे, एक रुपया, २ रुपये, ५ रुपये, १०, रुपये आणि २० रुपयांच्या नाण्यांचीही निर्मिती केली जाते.

नोटांच्या मूल्यात १४.७ टक्के वाढ
रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात नमूद केल्यानुसार आर्थिक वर्ष २०२०मध्ये बाजारात असणाऱ्या बँकेच्या नोटांचे मूल्य १४.७ टक्क्यांनी आणि संख्या ६.६ टक्क्यांनी वाढले. मूल्यानुसार मार्च २०२०च्या अखेरीस बाजारातील १० आणि १०० रुपयांच्या नोटांचा एकूण हिस्सा ४३.४ टक्के होता. याच कालावधीत ५०० रुपयांच्या नोटांचे बाजारातील प्रमाण वाढल्याचे दिसून आले.

बाजारांतील रोकड एका दृष्टिक्षेपात
– ३१ मार्च २०२०ला २४ लाख ४७ हजार ३१२ कोटी रुपयांची रोकड बाजारांत.

– १ जानंवारी २०२१ला बाजारांमधील रोकड २७ लाख ७० हजार ३१५ कोटींवर.

– आर्थिक वर्ष २०२०मध्ये एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत रोख रकमेत सहा टक्क्यांची वाढ.

– वर्ष २०२०मध्ये बाजारांमधील रोख रकमेत २२.१ टक्क्यांची वाढ.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here