ब्रिस्बेन, : चौथा कसोटी सामना खेळण्यासाठी भारतीय संघ ब्रिस्बेनला दाखल झाला. पण हॉटेलमध्ये पोहोचल्यावर भारतीय संघाचे हाल सुरु झाले होते, त्यांना कोणतीच सुविधा मिळत नव्हती. ही गोष्ट बीसीसीआयला समजली. त्यानंतर बीसीसीआयने चांगलाच दट्टा दिल्यावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला सर्व सुविधा दिल्याचे आता पाहायला मिळत आहे.

भारतीय संघ ब्रिस्बेनच्या हॉटेलमध्ये पोहोचला तेव्हा त्यांना हाऊसकिपिंगची सुविधाही देण्यात आली नव्हती. रुममधील टॉयलेटपासून अन्य साफ सफाई करण्यासाठी कोणताही कर्मचारी भारतीय संघाला देण्यात आला नव्हता. त्याचबरोबर भारतीय खेळाडूंना व्यायामशाळा आणि स्विमिंग पूलवर जाण्यासही मनाई करण्यात आली होती.

ही सर्व गोष्ट भारतीय संघातील खेळाडू आणि प्रशिक्षक यांनी बीसीसीआयच्या कानावर घातली. त्यानंतर बीसीसीआयने त्वरीत पावले उचलली आणि ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाबरोबर संपर्क साधला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाला जाग आली आणि त्यांनी भारतीय संघाला सर्व सुविधा मिळवून दिल्या. आता ही लढाई तर भारतीय संघाने जिंकली आहे, पण चौथ्या कसोटीची लढाई मात्र दोन दिवसांवर येऊन ठेपली असून भारतीय संघापुढे आता बऱ्याच अडचणी आहेत.

भारतापुढे चौथ्या कसोटी सामन्याला सामोरे जाताना बऱ्याच दुखापतींचा सामना करावा लागत आहे. कारण भारताचे पाच खेळाडू सध्याच्या घडीला दुखापतग्रस्त आहेत. त्यामुळे ही भारतीय संघापुढेल सर्वात मोठी समस्या असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे चौथ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात कोणाल स्थान मिळते, याची उत्सुकता सर्वांनाच असेल.

भारताचे गोलंदाजीमधील मुख्य अस्त्र असलेल्या जसप्री बुमराला आता गंभीर दुखापत झाल्याचे समोर येत आहे. बुमराच्या ओटीपोटीमध्ये दुखत आहे. त्याचबरोबर चौथा कसोटी सामना सुरु व्हायला फक्त तीन दिवसांचा अवधी असून त्यामध्ये बुमरा फिट हाऊ शकत नाही, असे म्हटले जात आहे. आर. अश्विनच्या पाठीमध्ये उसण भरल्याचेही समजत आहे. तिसरा सामना खेळत असताना अश्विनला पाठीमध्ये दुखापत झाली होती, ही दुखापतही गंभीर असल्याचे म्हटले जात आहे. त्याचबरोबर रवींद्र जडेजाही आता चौथ्या कसोटीत खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

तिसरा सामना वाचवणारा भारताचा फलंदाज हनुमा विहारीलाही गंभीर दुखापत झाल्याचे समोर आले आहे, त्याचे पायाचे स्नायू दुखावले गेले आहेत. दुखापतग्रस्त असूनही तो तीन तास खेळत राहीला. पण आता हनुमाची दुखापत बळावली असल्याचे म्हटले जात आहे. हनुमाच्या जागी संघात मयांक अगरवालला स्थान मिळू शकत होते. पण सराव करत असताना मयांकलाही दुखापत झाली आहे. त्याच्या हाताला आता हेअरलाइन फ्रॅक्चर झाल्याचे समजत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here