राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या फेसबुक पोस्टमुळं महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. मुंडे यांच्या फेसबुक पोस्टमध्ये त्यांच्या दुसऱ्या लग्नाबाबतही खुलासा करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर देशातील काही राजकीय नेत्यांच्या दुसऱ्या लग्नांच्या गोष्टी समोर आल्या आहेत. याबाबत घेतलेला हा आढावा

अभिनेत्री राधिकासोबत कुमार स्वामी यांचा विवाह
काही वर्षांपूर्वी कर्नाटकमधील जनता दल पक्षाचे नेता कुमार स्वामी यांनी चित्रपट अभिनेत्री राधिकासोबत गपचुप लग्न केलं होतंय. जेव्हा ही बातमी समोर आली तेव्हा कर्नाटक आणि कन्नड चित्रपटसृष्टीत मोठा गदारोळ माजला होता. कुमार स्वामी आणि राधिका या दोघांचेही हे दुसरे लग्न होते. १९८६मध्ये कुमारस्वामी यांचे अमिताशी लग्न झालं होतं. अनितापासून कुमारस्वामींना एक मुलगादेखील आहे. तर, २००६ मध्ये कुमारस्वामींनी राधिकाशी लग्न केलं. या दोघांना शमिका कुमारस्वामी नावाची एक मुलगी देखील आहे. कुमारस्वामी यानांही राधिकासोबत लग्न केल्यानंतर कायदेशीर वादाला सामोरे जावं लागलं. हिंदू वैयक्तिक कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत त्यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, पुरावा नसल्यामुळं हायकोर्टानं हे प्रकरण फेटाळून लावले.

एनडी तिवारी यांचं लग्न

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री नारायण दत्त तिवारी यांनी वयाच्या ८८ व्या वर्षी हिंदू धर्माप्रमाणे लग्न करावं लागलं होतं. एन.डी तिवारी आणि उज्ज्वला शर्मा यांच्या लग्नानं देशातील राजकारणात मोठं वादळ निर्माण झालं होतं. २०१४ मध्ये नारायण तिवारी यांनी लग्न केलं होतं. परंतु, याआधी उज्ज्वला शर्मा यांचा मुलगी रोहित शेखरनं आपण एनडी तिवारी यांचा मुलगा असल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर त्याला मोठी कायदेशीर लढाई लढावी लागली होती. रोहित शेखर हा एनडी तिवारी यांचा मुलगा आहे का हे तपासण्यासाठी डीएनए टेस्ट करण्यात आली होती. यात रोहित शेखर एनडी तिवारी यांचा मुलगा असल्याचं स्पष्ट झालं होतं. या सर्व घडामोडींनंतर एनडी तिवारी यांनी उज्ज्वला शर्मा यांच्यासोबतचे संबंध स्विकारले होते. त्यानंतर त्यांनी १४ मे २०१४मध्ये दुसरं लग्नही केलं होतं. यापूर्वी १९५४मध्ये त्यांचं सुशीला तिवारी यांच्यासोबत लग्न झालं होतं.

रामविलास पासवान यांचं दुसरं लग्न

केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पक्षाचे दिवंगत नेते रामविलास पासवान यांनीही दोन लग्न केली होती. राम विलास पासवान यांनी १९८३ साली रिना पासवान यांच्याशी दुसरं लग्न केलं होतं. या दोघांनाही चिराग आणि निशा पासवान अशी दोन मुलं आहेत. याआधी १९६० मध्ये पासवान यांचं राजकुमारी देवी यांच्याशी लग्न झालं होतं. राजकुमारी देवी आणि रामविलास पासवान या जोडप्याला उषा आणि आशा या दोन मुली आहेत. मात्र, या दोघांनी १९८१ मध्ये घटस्फोट घेतला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here