– पुरुषोत्तम शुक्ल

मेष – प्रगतीची वाटचाल कराल

शनी महाराजांचा मकर राशीत झालेले आगमन आपणास फार मोठा दिलासा देणार आहे. आगामी ४/५ वर्षांचा काळ आपणास त्रासदायक जाणार नाहीत. आपण आत्तापर्यंत फार त्रास सहन केला, पण या सप्ताहापासून आपला अडथळ्यांचा काळ संपला असून आपले ध्येय गाठण्याकडे आपली पाऊलवाट सुरू राहील. आपली अनेक क्षेत्रांत प्रगतीची वाटचाल सुरू राहील. आर्थिक बाजू सावरता येईल. प्रवासाचे योग येतील. मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. प्रकृतीमान ठीक राहील. वैवाहिक व कौटुंबिक जीवन चांगले राहील. विवाहइच्छुकांच्या आशा पल्लवित होतील.

वृषभ – त्रास कमी होईल

शनी महाराजांची मकर राशीत झालेले प्रस्थान आपणास बऱ्यापैकी हितकारक ठरू शकेल. आपल्या त्रासाचा शेवट होणार आहे. ग्रहांची अनुकूलता लाभल्याने पुष्कळशा गोष्टी प्राप्त होण्याचा हा काळ राहील. प्रकृतीमान ठीक असले तरी खाण्यापिण्याची पथ्ये पाळावीत. प्रवासाचे योग येतील. नोकरी-व्यवसायात प्रगती करण्याची संधी प्राप्त होईल. राजकीय व क्रीडा क्षेत्रांत जम बसविण्याची संधी प्राप्त होईल. शिक्षण, बँकिंग, मार्केटिंग आदी क्षेत्रांत अनुकूलता लाभू शकेल. ओळखींचा लाभ घेता येईल. आपल्या रागावर योग्य नियंत्रण ठेवा. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी सामंजस्य ठेवावे.

मिथुन – सर्वसाधारण आठवडा

शनीबदल आपल्या राशीसाठी फार अनुकूल असणार नाही पण आपले दैनंदिन कार्य पार पाडू शकाल. हितशत्रूंची चिंता सध्या करू नये. विवाहइच्छुकांना हा काळ चांगला राहील. सरकारी नियमांचे पालन करण्यास विसरू नका. प्रवास योग येतील. कलाक्षेत्राला चांगला प्रतिसाद मिळेल. आर्थिक बाजू ठीक राहील. वरिष्ठांशी जुळवून घेण्याचे धोरण स्वीकारणे हितकारक राहील. प्रकृतीबाबत चालढकलपणा करू नये. पथ्यपाणी सांभाळावे व नियमित व्यायाम व योगाची पद्धत स्वीकारावी. वैवाहिक जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. ज्येष्ठांची मदत घ्यावी.

कर्क – सकारात्मक विचाराने वागा

शनी बदलल्यामुळे आपणास फार मोठा लाभ मिळेल याचा विचार करणे थांबवा व सकारात्मक ऊर्जेत राहून कामाचे योग्य नियोजन करून आपले कार्य साध्य करण्याचा प्रयत्न करावा. पैशाचे व्यवहार दक्षतेने करा. कोर्ट कामकाजात कुठलीही बाब ताणून न धरता तडजोडीचे धोरण स्वीकारणे अधिक हितकारक ठरेल. आपल्या रागावर योग्य नियंत्रण ठेवा. राजकीय व क्रीडा क्षेत्रांत प्रगती करण्याची संधी मिळेल. नको त्या प्रलोभनात अडकू नका. सरळ मार्ग स्वीकारा. प्रकृतीची पथ्ये पाळा. जोडीदाराची साथ मिळेल.

सिंह – परिश्रमाने यश मिळवाल

या सप्ताहात शनीबदलामुळे बरीचशी अनुकूलता आपणास मिळू शकते, पर्यायाने आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी परिश्रमाची जोड देऊन आपण यशाची पायरी चढू शकाल. सुनियोजित कामकाजात सफलता मिळू शकेल. कोणाशीही नाहक वाद घालण्याच्या फंदात पडू नये. आर्थिक बाबतीत सतर्क राहाल तर त्रास टाळू शकाल. कलाक्षेत्राला चांगले प्रोत्साहन मिळेल. प्रवासाचे योग येतील. कौटुंबिक वातावरण वादासारख्या कारणांनी बिघडणार नाही याची दक्षता घ्या. प्रकृतीच्या बाबतीत जागरूक राहा, पथ्यपाणी सांभाळा. वैवाहिक जोडीदाराची चांगली साथ मिळेल.

कन्या – वाद टाळा, सफलता मिळवा

नुकताच झालेला शनीबदल आपल्या राशीस फार चांगला नसला तरी काही प्रमाणात अनुकूलता मिळू शकेल. बऱ्याच गोष्टींत वादविवाद होणार नाही याची दक्षता घेतल्यास कामकाजात सफलता मिळू शकेल. आपण चांगल्या व्यक्तींच्या सहवासात राहणे हितकारक ठरेल. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. काही नव्या गोष्टी स्मरणात ठेवल्यास त्याचा भावी काळात उपयोग करता येईल. प्रकृतीबाबत चालढकलपणा टाळा, विशेषत: दाताचे दुखणे, घशाचे विकार, स्नायूंच्या तक्रारी याकडे अधिक लक्ष द्या. कोर्टाच्या कामात सुलभता जाणवेल. जोडीदाराची साथ मिळेल.

तूळ – धीम्या गतीने पुढे जाल

आपले ग्रहमान पाहता आपला कार्यभाग काहीसा धीम्या गतीने पुढे सरकू शकेल. प्रवासाचे योग येतील. मानसिक स्थिती भक्कम राहील. आर्थिक बाजूही सावरता येईल. मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. शिक्षण, कला, साहित्य अशा क्षेत्रांत प्रगती करण्याची संधी प्राप्त होईल. महिलांना अंगीभूत कलागुणांना चांगले प्रोत्साहन मिळेल. बोलण्यावर योग्य नियंत्रण ठेवणे हितकारक ठरेल. आपला जोम व उत्साह वृद्धिंगत होईल. कौटुंबिक व वैवाहिक जीवन चांगले राहील.

वृश्चिक – मोठा दिलासा मिळेल

सप्ताहातील शनीबदल हा आपल्या दृष्टीने आपणास निश्चितपणे सर्व बाबतीत मोठा दिलासा देणारा ठरणार आहे. अनेक अडचणींतून आपली सुटका होणार आहे. शुभकार्याची नांदी आपणास मिळू शकेल. कामाचा नवा उत्साह देणारा हा काळ राहील. आपल्याला कार्यात एखादी संधी प्राप्त होऊ शकेल. परदेशगमनाचे योग येतील. नव्या शिक्षणाचा प्रारंभ करता येईल. आगामी काळाची रूपरेखा आखता येईल. कोणालाही नाराज न करता आपले उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न करा. मुलांकडून सुवार्ता समजतील. कौटुंबिक व वैवाहिक जीवनात सूर जुळू लागतील. प्रकृतीमान ठीक राहील.

धनू – खर्च वाढेल, स्वास्थ्य जपा

शनीबदल झाला तरी साडेसातीच्या शेवटच्या पर्वातून आपण प्रवास करीत आहात हे विसरू नका. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे, तरी प्रथमपासून अनावश्यक खर्च टाळा. वाहनांच्या वेगावर योग्य नियंत्रण ठेवा. गुरूकृपेचा लाभ आपणास मिळणार आहे. साडेसातीची धास्ती बाळगण्याचे कारण नाही. आगामी काळात चांगल्या परिणामांची बातमी आपणास मिळू शकेल. प्रकृतीस्वास्थ्याबाबत जागरूक राहा, विशेषत: खाण्यापिण्याची पथ्ये कटाक्षाने पाळा. आपले दैनिक वेळापत्रक बदलू नका. आप्त, मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. कौटुंबिक जीवन सुखमय राहील.

मकर – चिंता सोडा, पुढे चला

शनी महाराज आपल्या राशीत प्रवेश करणार म्हणून आपण चिंता करू नये. कारण आपली रास शनी महाराजांची स्वराशी असल्याने साडेसाती फार जाचक राहणार नाही. पैशाची आवक ठीक राहील. काही जुनी येणी वसूल होण्याची शक्यता राहील. कोर्टदरबारची कामे सध्या तरी पुढे ढकलावीत. आपल्या विचारावर ठाम राहा. एखाद्या धार्मिक अथवा आध्यात्मिक कार्यभाग घेण्याची संधी प्राप्त होईल. वरिष्ठांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करा. प्रकृतीस्वास्थ्याबाबत अधिक जागरूक राहा. वैवाहिक जोडीदाराची मदत मिळेल.

कुंभ – साडेसाती सुरू, चिंता नसावी

शनी महाराज यांचे आगमन मकर राशीत आल्याने आपल्या राशीस साडेसाती सुरू झाली आहे पण त्यांची चिंता करू नका. फक्त कायदा व नियम यांचे पालन कटाक्षाने पाळण्याचा प्रयत्न करा. आपली राशी शनीप्रधान असल्याने फार जाचक जाणार नाही हे लक्षात घ्या. नोकरदारांनी वरिष्ठांशी वादविवाद न करता मिळते-जुळते घेण्याचे धोरण स्वीकारावे. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी. फाजील आत्मविश्वास न दाखवता साधक-बाधक विचाराने निर्णय घ्या. प्रत्येक गोष्टीत सावधानता बाळगावी. प्रकृतीबाबत चढउतार संभवतो. जोडीदाराशी सामंजस्याने वागा.

मीन – अनुकूलता राहील

शनीबदलाची धास्ती न बाळगता दैनंदिन कार्य सुरू ठेवा. शनी महाराज काहीसे अनुकूल राहणार आहेत. आर्थिक बाजू सावरता येईल. उद्योगधंद्यात वाढ झाल्याचे संकेत मिळतील. राजकीय क्षेत्रात आपला जम बसविता येईल. प्रलोभनांपासून दूर राहणे योग्य राहील. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी प्राप्त होईल. कला, प्रदर्शनीय वस्तू यात उत्तम वाव व संधी मिळू शकेल. प्रकृतीबाबत अधिक जागरूक राहा. आवश्यक तेथे ज्येष्ठांचे मार्गदर्शन अवश्य घ्या. वैवाहिक जोडीदाराची साथ मिळेल.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here