तेजस हवेतून हवेत आणि हेवतून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्रे डागू शकतो. या विमानावर जहाज विरोधी क्षेपणास्त्र, बॉम्ब आणि रॉकेटसुद्धा लावता येऊ शकतात. तेजस ४२ टक्के कार्बन फायबर, ४३ टक्के अॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण आणि टायटॅनियमपासून बनवण्यात आले आहे. तेजस स्वदेशी चौथ्या पिढीचे टेललेस कंपाऊंड डेल्टा विंग विमान आहे. हे चौथे पिढीतील सुपरसोनिक लढाऊ विमानांच्या गटामधील सर्वात हलके आणि सर्वात लहान विमान आहे. तेजस लढाऊ विमानांना (LCA) भारतीय हवाई दलाने पश्चिमेला पाकिस्तान सीमेजवळ तैनात केले आहे.
हिंदुस्तान अॅरोनॉटिक्स लिमिटेडने (HAL) यापूर्वीच नाशिक आणि बेंगळुरू विभागात उत्पादन निर्मितीची सुविधा स्थापन केली आहे. एलसीए-एमके 1 ए हे विमान भारतीय हवाई दलाला देणार आहे. आजच्या निर्णयामुळे विद्यमान एलसीए प्रणालीचा मोठ्या प्रमाणात विस्तार होईल आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्यात मदत होईल, असं राजनाथ सिंह म्हणाले.
पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील सीसीएसने आज देशातील सर्वात मोठ्या संरक्षण करारारावर ऐतिहासिक शिक्कामोर्तब केलं आहे. हा करार ४८ हजार कोटींचा आहे. हे स्वदेशी ‘एलसीए तेजस’ च्या माध्यमातून आमच्या हवाई दलाचे सामर्थ्य वाढवेल. हा करार भारताच्या संरक्षण उत्पादनासाठी गेम चेंजर असल्याचं सिद्ध होईल, असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं.
सरकारच्या या निर्णयाचं डीआरडीओच्या प्रमुखांनी स्वागत केलं आहे.
शक्ती वाढवण्याचा भारताचा प्रयत्न
चीन आणि पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण क्षेत्रातील आपली शक्ती वाढवण्यासाठी अलिकडच्या काळात भारताने अनेक पावलं उचलली आहेत. अलिकडेच भारत आणि अमेरिकेत कॅलिबर बंदुकींसाठी डील झाली. अमेरिकेने भारतीय नौदलाच्या युद्धनौका तातडीने कॅलिबर तोफांनी सुसज्ज करण्यास सहमती दिली. अमेरिकन बीएई सिस्टमद्वारे १२७ मिमी मिडियम कॅलिबर तोफा तयार केल्या जातात. हा करार ६०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा असेल. भारतीय नौदलाला पहिल्या तीन तोफा अमेरिकेच्या नौदलाच्या साठ्यातून देण्याची मागणी करण्यात आली आहे. भारतीय नौदलाच्या युद्धनौका लवकरात लवकर सुसज्ज व्हाव्यात, असा प्रयत्न आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times